हार्दिक पांड्याला सपोर्ट करत नाही राहुल द्रविड, टीमला हवा आशिष नेहरासारखा प्रशिक्षक, हे काय म्हणाला माजी यष्टिरक्षक?


भारतीय क्रिकेट संघाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यातही पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर हार्दिक पांड्याच्या संघाला पाच सामन्यांची टी-20 मालिका जिंकणे कठीण झाले आहे. मालिका जिंकायची असेल, तर त्याला सलग तीन सामने जिंकावे लागतील. तिसरा सामना त्यांच्यासाठी करा किंवा मरो अशी स्थिती आहे. हा सामना गेला, तर मालिकाही हाताबाहेर जाईल. दुसरा सामना गमावल्यानंतर टीम इंडियावर टीका होत असून भारताचा माजी यष्टिरक्षक पार्थिव पटेलने संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर निशाणा साधला आहे. पांड्याला प्रशिक्षक द्रविडकडून हवा तसा पाठिंबा मिळत नसल्याचे पार्थिवने म्हटले आहे.

भारतीय संघ कमकुवत वेस्ट इंडिजकडून सलग दोन टी-20 सामने गमावेल आणि मालिका गमावण्याच्या उंबरठ्यावर उभा राहील, अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. या दोन पराभवांमुळे पांड्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसऱ्या सामन्यात लेगस्पिनर युझवेंद्र चहलला कोट्यातील पूर्ण चार षटके न देण्याच्या त्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

द्रविडने T20 विश्वचषक-2021 नंतर संघाची जबाबदारी स्वीकारली. त्याच्या आगमनानंतर संघात बदल होईल आणि संघाचा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ संपेल, अशी अपेक्षा होती. मात्र गेल्या वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पांड्याने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. पांड्याने आपल्या कर्णधारपदाखाली गुजरात टायटन्सला पहिल्याच सत्रात आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवून दिले आणि या संघाला आयपीएल-2023 मध्ये अंतिम फेरीत नेले. आशिष नेहरा हे गुजरातचे मुख्य प्रशिक्षक आहेत. पार्थिव म्हणाला की, गुजरातमधील नेहराकडून पांड्याला मिळत असलेला पाठिंबा द्रविड देऊ शकत नाही.

पार्थिवने क्रिकबझवर सांगितले की, पांड्याने गुजरातसाठी उत्तम कर्णधारपद केले आणि तेथे त्याला नेहराचा पाठिंबा मिळत होता. पार्थिवने प्रश्न उपस्थित केला की, टी-20 फॉरमॅटमध्ये द्रविड हा डायनॅमिक प्रशिक्षक आहे का? द्रविड असा प्रशिक्षक आहे, असे मला वाटत नाही, असे पार्थिव म्हणाला. तो म्हणाला की संघाला सक्रिय प्रशिक्षकाची गरज आहे, कारण पांड्यामध्ये ती क्षमता आहे, पण त्याला द्रविडचा पाठिंबा हवा आहे जो त्याला मिळत नाही.