मुकेश अंबानींच्या रिलायन्सने रचला विक्रम, एका वर्षात दिल्या 2.60 लाख लोकांना नोकऱ्या


मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीने नवा विक्रम रचला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या वर्षभरात 2.60 लाख लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. त्याचवेळी मुकेश अंबानी यांनी गेल्या तीन वर्षांत एक रुपयाही पगार घेतलेला नाही. 2022-23 मध्ये रिलायन्स ग्रुपने 2.62 लाख लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. त्यापैकी 1.8 लाख लोक रिटेलशी संबंधित आहेत, तर 70,500 लोक जिओशी संबंधित आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजने विविध व्यवसायांमध्ये 2,62,558 नोकऱ्या निर्माण करून भारतीयांसाठी रोजगाराचा नवा विक्रम निर्माण केला आहे. आतापर्यंत एका वर्षात कोणत्याही कंपनीने असा विक्रम केला नाही. रिलायन्सच्या वार्षिक अहवालानुसार, 2,45,581 ऑन-रोल कर्मचाऱ्यांसह, रिलायन्स रिटेल देशातील सर्वात मोठी नियोक्ता बनली आहे. त्याच वेळी, RIL ची एकूण कर्मचारी संख्या वाढून 3.89 लाख झाली आहे.

रिलायन्सने नोकऱ्यांमध्ये वाढ केलेले हे सलग तिसरे वर्ष आहे. 2021-22 मध्ये, कंपनीने आपल्या विविध व्यवसायांमध्ये विक्रमी 2.32 लाख नोकऱ्या दिल्या होत्या. यापूर्वी, कंपनीने 2020-21 मध्ये 75,000 नवीन नोकऱ्या कोरोनाच्या काळातही अनेक निर्बंध असतानाही दिल्या होत्या.

वार्षिक अहवालानुसार, यावेळीही रिलायन्स इंडस्ट्रीज सर्वाधिक कर भरणारी कंपनी राहिली आहे. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या गेल्या आर्थिक वर्षात, रिलायन्स इंडस्ट्रीजने कर म्हणून सरकारी तिजोरीत 1.77 लाख कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. यापूर्वी, 2021-22 या आर्थिक वर्षात, सर्वात मोठ्या कंपनीने कर म्हणून 1.88 लाख कोटी रुपये जमा केले होते. कंपनीने गेल्या तीन वर्षांत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर, स्पेक्ट्रम शुल्क इत्यादींसह 5.65 लाख कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा केले आहेत.