ऑस्ट्रेलियाने जाहीर केला वनडे विश्वचषकासाठीचा संघ, मार्नस लबुशेनला वगळले, जाणून घ्या डेव्हिड वॉर्नरचे काय झाले?


ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे. 18 सदस्यीय संघात मार्नस लबुशेनला स्थान न मिळाल्याने एकदिवसीय विश्वचषक खेळण्याचे त्याचे स्वप्न भंगले. त्याचवेळी डेव्हिड वॉर्नरला स्थान मिळवण्यात यश आले आहे. दरम्यान ऑस्‍ट्रेलियाचा संघ नुकताच भारत दौ-यावर आला होता, तेव्हा लबुशेन संघाचा एक भाग होता. पण, आता त्याला संघाबाहेर राहून अपयशाची किंमत मोजावी लागली आहे. लबुशेनने भारताविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत केवळ 43 धावा केल्या.

मार्नस लॅबुशेनने ऑस्ट्रेलियासाठी 30 एकदिवसीय सामने खेळले असून, त्याने 31.37 च्या सरासरीने केवळ 847 धावा केल्या आहेत. लबुशेनच्या नावावर एकदिवसीय सामन्यांच्या 28 डावांमध्ये केवळ 1 शतक आणि 6 अर्धशतके आहेत. लबुशेनने 2020 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. अशा स्थितीत त्याची ऑस्ट्रेलियन संघात निवड झाली असती, तर तो प्रथमच एकदिवसीय विश्वचषक खेळताना दिसला असता. पण, त्याला संघातून वगळण्याच्या निर्णयानंतर तसे होऊ शकले नाही.


पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केवळ 18 सदस्यीय संघाचीच निवड केली नाही तर त्याआधी दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेसाठीही निवड केली आहे.

ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेत 5 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे, त्यानंतर त्याला एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारताचा दौरा करायचा आहे. ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, जिथे तो 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.