Nitin Desai Funeral : जिथे अंतिम क्षण घालवले, तेथेच होणार नितीन देसाई यांच्यावर अंत्यसंस्कार


कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाने त्यांचे लाखो चाहते दु:खी झाले आहेत. संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. नितीन देसाई यांनी एकापेक्षा एक उत्तम चित्रपटांमध्ये आपली कला दाखवली आहे. 02 ऑगस्ट 2023 रोजी नितीन देसाई यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या निधनाने कुटुंबीय आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. नितीन देसाई यांनी आयुष्यातील शेवटचे क्षण जिथे घालवले, त्याच एनडी स्टुडिओमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

नितीन देसाई यांची मुले अमेरिकेत राहतात. वडिलांच्या निधनाची बातमी मिळताच ते अमेरिकेहून रवाना झाले आहेत. मुले पोहोचल्यावर नितीन देसाई यांच्यावर त्यांच्या स्टुडिओतच अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे कुटुंबीयांच्या वतीने सांगण्यात आले आहे. नितीन देसाई यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार होणार असल्याचे समजते.

नितीन देसाई यांनी अमिताभ बच्चन ते आमिर खानपर्यंत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. 4 वेळा राष्ट्रीय पुरस्कार आणि 9 वेळा फिल्मफेअर पुरस्कार पटकावलेले नितीन देसाई हे बॉलिवूड स्टार्सच्या हृदयाच्या जवळ होते. अक्षय कुमारसोबत त्यांची मैत्री खूप घट्ट होती. त्याच्या अंतिम दर्शनासाठी बॉलीवूडचे सर्व स्टार्स पोहोचतील असे मानले जात आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीन देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस आता सर्व बाजूंचा तपास करत आहेत. पोलिसांना नितीन देसाईच्या फोनमध्ये एक ऑडिओ क्लिपही सापडली असून त्यात काही लोकांचा उल्लेख आहे. त्यांनी कुठल्यातरी दबावाखाली आत्महत्या केली असेल याचा पोलिसांचा संशय आहे.

नितीन देसाई यांच्या वडिलांचे नाव चंद्रकांत गणपत देसाई आणि आईचे नाव मीना चंद्रकांत देसाई होते. त्यांची आईही चित्रपट निर्माती होती. चित्रपट पार्श्वभूमीतून आलेल्या नितीन देसाई यांच्या पत्नी नैना नितीन देसाई याही चित्रपट निर्मात्या आहेत. 2018 मध्ये त्यांनी ट्रकभर स्वप्न या चित्रपटाची निर्मिती केली. नितीन देसाई यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी 2 मुले आहेत. त्यांची मुलगी मानसी देसाई निर्मिती समन्वयक म्हणून काम करते.