कोण फेडणार नितीन देसाईंचे 250 कोटींचे कर्ज, काय सांगतात बँकेचे नियम?


बॉलिवूडचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. खोलीत त्यांचा मृतदेह दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन देसाई यांच्यावर 250 कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यांनी एका कंपनीकडून 180 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. व्याजासह कर्जाची एकूण रक्कम 250 कोटी झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण पडत होता. याच कर्जामुळे नितीन देसाई यांनी जीवनयात्रा संपवली असल्याचे बोलले जात आहे.

आता त्यांच्या मृत्यूनंतर 250 कोटींचे कर्ज कोण फेडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. चला तर मग आज जाणून घेऊया, जर एखाद्या कर्जदाराचा मृत्यू झाला, तर अशा परिस्थितीत कर्जाची परतफेड कशी होते. बँका आणि वित्त कंपन्या कर्जाची रक्कम कशी व कोणाकडून वसूल करतात.

काय आहेत नियम ?
कर्ज वसुलीबाबत वेगवेगळे नियम करण्यात आले आहेत. कर्जदाराचा मृत्यू झाल्यास गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या वसुलीबाबत वेगवेगळ्या पद्धतीने कारवाई केली जाते. म्हणूनच तुम्हाला प्रत्येक कर्जाचा हिशोब समजून घ्यावा लागेल, कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कोण करतो कर्जाची परतफेड?

काय आहेत गृहकर्जाचे नियम ?
गृहकर्जासाठी वेगवेगळे कायदे करण्यात आले आहेत. एखाद्याला गृहकर्ज घ्यायचे असेल, तर त्याला घराची कागदपत्रे गहाण ठेवावी लागतात. यादरम्यान व्यक्तीचा मृत्यू झाला, तर कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी सहकर्जदाराची असते. याशिवाय मयत व्यक्तीच्या वारस जसे मुलगा-मुलगी किंवा नातेवाईक यांच्यावरही कर्ज जमा करण्याची जबाबदारी असते. सहकर्जदार आणि वारसदार कर्जाची परतफेड करू शकत असल्यास, त्यांना जबाबदारी दिली जाते.

विशेष बाब म्हणजे बँका आणि फायनान्स कंपन्या सहकर्जदार आणि उत्तराधिकारी यांना त्यांची मालमत्ता विकल्यानंतरही कर्जाची परतफेड करण्याचा पर्याय देतात. सहकर्जदार आणि वारसांनाही हा पर्याय स्वीकारता येत नसेल, तर बँक कर्जापोटी ठेवलेल्या मालमत्तेचा लिलाव करते. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून बँक थकबाकीची रक्कम वसूल करते. मात्र, आता गृहकर्जाच्या बाबतीत, कर्ज देताना बँकेकडून विमा काढला जातो. व्यक्तीचा मृत्यू झाल्यास बँक विम्याद्वारे त्याची वसुली करेल.

वैयक्तिक कर्जाबाबत हा आहे नियम
वैयक्तिक कर्ज आणि गृहकर्जाचे नियम वेगळे आहेत. वैयक्तिक कर्ज सुरक्षित कर्जाच्या कक्षेत येत नाही. अशा परिस्थितीत, कर्जाची परतफेड करण्यापूर्वी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, बँक त्याऐवजी इतर कोणत्याही व्यक्तीकडून पैसे वसूल करू शकत नाही. विशेष म्हणजे वैयक्तिक कर्जासाठी उत्तराधिकारी जबाबदार नाही.

काय आहेत वाहन कर्जाचे नियम ?
तथापि, वाहन कर्ज हा सुरक्षित कर्जाचा प्रकार आहे. जर एखाद्या व्यक्तीने वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले आणि त्यादरम्यान त्याचा मृत्यू झाला, तर बँक कुटुंबातील सदस्यांना कर्जाची परतफेड करण्यास सांगेल. त्यांनी कर्जाची परतफेड न केल्यास बँक वाहन जप्त करते आणि त्याची विक्री करून कर्जाची रक्कम वसूल करते.