US : मरणासन्न अवस्थेत असलेल्या नातेवाईकाशी हिंदीत बोलला म्हणून भारतीय इंजिनिअरला कंपनीने काढून टाकले कामावरून


अमेरिकेतील एका भारतीय वंशाच्या अभियंत्याला हिंदी बोलण्याचा फटका सहन करावा लागला. या 78 वर्षीय व्यक्तीला त्याच्या नातेवाईकाशी व्हिडीओ कॉलवर हिंदीत बोलत असल्यामुळे नोकरीवरून काढून टाकण्यात आले. अनिल वार्ष्णेय असे या व्यक्तीचे नाव आहे. वार्ष्णेय हे अलाबामा येथील हंट्सविले क्षेपणास्त्र संरक्षण कंत्राटदार पार्सन्स कॉर्पोरेशनमध्ये दीर्घकाळ काम करत होते.

या कंपनीत ते वरिष्ठ यंत्रणा अभियंता होते. वास्तविक ही घटना गेल्या वर्षी 26 सप्टेंबरची आहे. 26 सप्टेंबर 2022 रोजी अनिल वार्ष्णेय हे भारतात राहणाऱ्या एका नातेवाईकाशी व्हिडिओ कॉलवर बोलत होते. त्याच्या सहकारी कामगाराने त्यांना हे करताना पाहिले. यानंतर त्याच्या गोऱ्या सहकाऱ्याने त्याला फोनवर बोलण्यास मनाई असल्याचे सांगितले. यानंतर त्याने लगेच कॉल कट केला.

ज्या नातेवाईकाशी अनिल वार्ष्णेय बोलत होते, तो मरणासन्न अवस्थेत होता. त्या नातेवाईकाशी झालेला हा शेवटचा संवाद होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वर्षानी ज्या नातेवाईकाशी बोलत होते त्याचे नाव केसी गुप्ता होते. केसी गुप्ता यांना त्यांच्या शेवटच्या क्षणी वार्ष्णेयशी बोलायचे होते. दोघांमध्ये सुमारे 2 मिनिटे चर्चा झाली.

काढून टाकल्यानंतर वार्ष्णेय यांनी पार्सन्स कॉर्पोरेशन आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड जे. ऑस्टिन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दाखल केलेल्या दाव्यात असा दावा करण्यात आला आहे की, त्याच्या सहकारी कामगाराने कंपनीला त्यांच्याबद्दल खोटी माहिती दिली. फोन कॉलमध्ये कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झाले नाही. गुप्ता यांच्याशी बोलताना त्यांनी मिसाइल डिफेन्स एजन्सी किंवा कंपनी पार्सन्स यांच्या कामाशी संबंधित कोणतीही गोपनीय माहिती शेअर केली नाही, असा दावा त्यांनी केला.

अनिल वार्ष्णेय यांनी 2011 ते 2022 पर्यंत पार्सन्स कॉर्पोरेशनमध्ये काम केले आहे. नोकरीतून काढून टाकण्याच्या निर्णयाला त्यांनी फेडरल कोर्टात आव्हान दिले आहे. आपल्यासोबत भेदभाव करण्यात आल्याचा आरोप त्याने दाखल केलेल्या गुन्ह्यात केला आहे, त्यामुळे त्याला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नोकरी गमवावी लागली होती.