जसप्रीत बुमराहला खेळायचे नाही ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली?


जसप्रीत बुमराह जवळपास वर्षभरानंतर मैदानात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तो निळ्या जर्सीत दिसला होता, तेव्हापासून तो दुखापतीशी झुंजत आहे. बुमराह आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि पुन्हा एकदा तो चेंडूने धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे. भारतीय वेगवान गोलंदाज बुमराह या महिन्यात आयर्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या 3 टी-20 मालिकेत मैदानात परतणार आहे. तो केवळ मैदानात परतणार नाही, तर संघाचे नेतृत्वही करणार आहे.

बुमराह थेट कर्णधार म्हणून मैदानात परतणार आहे. बुमराहला आयर्लंड दौऱ्यासाठी कर्णधार बनवल्यानंतर गोंधळ सुरू आहे. आयर्लंड दौऱ्यासाठी बुमराहकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे, तर ऋतुराज गायकवाडची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली होती. आयर्लंड मालिकेनंतर लगेचच टीम इंडियाला आशियाई खेळ खेळायचे आहेत आणि गायकवाड आशियाई स्पर्धेमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे.

अशा परिस्थितीत गायकवाडला आयर्लंडच्या आशियाई दौऱ्यापूर्वी कर्णधारपदाचा अनुभव घेण्याची चांगली संधी आहे, मात्र निवड समितीने बुमराहला ही संधी दिली, त्यानंतर गदारोळ झाला. गायकवाडला आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी कर्णधार म्हणून तयारीची संधी का देण्यात आली नाही, असा प्रश्न क्रिकेट वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, निवडकर्त्यांनी गायकवाडला आयर्लंड दौऱ्यासाठी कर्णधारपद देण्याची चर्चा केली होती. गायकवाडच्या कर्णधारपदामुळे बुमराहच्या कामाचा ताणही कमी झाला असता, पण वेगवान गोलंदाज बुमराहला कर्णधार बनायचे होते, असे मानले जाते. बुमराहने यापूर्वी गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या बर्मिंगहॅम कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व केले होते.