देवदास-जोधा अकबरचे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या, स्टुडिओत सापडला मृतदेह


बॉलिवूडचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जतजवळील खालापूर रायगड येथील त्यांच्या स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपासात गुंतले आहेत. या बातमीने फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. नितीन देसाई यांनी जोधा अकबर आणि देवदास सारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये कला दिग्दर्शक म्हणून काम केले.

नितीन देसाई यांच्या मृत्यूबाबत एसपीचे म्हणणे आहे की ते प्रत्येक कोनातून तपास करत आहेत. मृतदेह दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस नितीन देसाई यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

नितीन देसाई यांनी आत्महत्या का केली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिस सूत्रांनी सांगितले की, नितीन देसाई काल रात्री 10 वाजता त्यांच्या खोलीत गेले होते. आज सकाळी ते बराच वेळ बाहेर आले नाही. त्यानंतर त्यांचा अंगरक्षक आणि इतर लोकांनी दरवाजा ठोठावला. मात्र, बराच वेळ दार ठोठावल्यानंतरही त्यांनी दरवाजा उघडला नाही. खिडकीतून पाहिले असता नितीन देसाई यांचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता.

नितीन देसाई यांनी लगान, हम दिल दे चुके सनम, मिशन कश्मीर, देवदास, खाकी, स्वदेश यांसारख्या चित्रपटांसाठी प्रॉडक्शन डिझायनर म्हणून काम केले. 2000 मध्ये हम दिल दे चुके सनम आणि 2003 मध्ये देवदाससाठी त्यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. याशिवाय हरिश्चंद्र फॅक्टरी या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला.

नितीन देसाई हे बॉलीवूडमध्ये कला दिग्दर्शक म्हणून काम करायचे, त्याशिवाय ते मराठी चित्रपटसृष्टीतही सक्रिय होते. नितीन देसाई मराठी चित्रपट दिग्दर्शनासोबतच चित्रपटांची निर्मितीही करत असत. इतकेच नाही तर त्यांनी काही चित्रपटांमध्ये स्वत: अभिनयही केला आहे. विशेष म्हणजे नितीन देसाई यांना चार वेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

नितीन देसाई यांनी चित्रपटांव्यतिरिक्त राजकीय पक्षांसाठीही काम केले. अनेक राजकीय पक्षांसाठी स्टेज तयार करण्यासाठीही त्यांची ओळख आहे. इतकंच नाही तर नितीन देसाईंनी सलमान खानच्या प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉसचे घरही डिझाइन केले आहे. याशिवाय त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या क्विझ शोमध्ये कला दिग्दर्शक म्हणूनही काम केले होते.त्याचबरोबर मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागचा राजाच्या सजावटीचे काम देखील ते मागील अनेकवर्षांपासून करत होते.

नितीन चंद्रकांत देसाई यांचा जन्म 6 ऑगस्ट 1965 रोजी महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे झाला. चार दिवसांनी त्यांचा वाढदिवस होता. ते 58 वर्षांचे होणार होते. पण त्यांनी या जगाचा निरोप घेतला. नितीन देसाई यांच्या पत्नी नेना नितीन देसाई या चित्रपट निर्मात्या आहेत. दोघांना एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन मुले आहेत.