WI vs IND : खेळपट्टीने दिला रोहित शर्माला ‘दगा’, का बदलला फलंदाजीचा क्रम यावर बोलला रोहित शर्मा


भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेची विजयाने सुरुवात केली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने यजमानांचा पाच गडी राखून पराभव केला. हा सामना बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला गेला, जिथे खेळपट्टीने फलंदाजांना आश्चर्यचकित केले. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे खूप कठीण होते. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने सामन्यानंतर सांगितले की, ही खेळपट्टी असा रंग बदलेल असे वाटले नव्हते. या सामन्यात टीम इंडियाने आपल्या फलंदाजीचा क्रमही बदलला. यावरही रोहितने आपले म्हणणे मांडले.

प्रथम गोलंदाजी करताना भारतीय संघाने कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजचा डाव अवघ्या 114 धावांत गुंडाळला. टीम इंडियाने हे लक्ष्य पाच विकेट्स गमावून पूर्ण केले. यासह तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

सामन्यानंतर जेव्हा रोहितला खेळपट्टीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तो म्हणाला की, ही खेळपट्टी असा खेळ दाखवेल असे वाटले नव्हते. संघाच्या गरजेनुसार भारताला धावफलकावर त्यांच्यासमोर धावा हव्या होत्या, पण खेळपट्टी अशी रंग बदलेल असे वाटले नव्हते, असे तो म्हणाला. रोहितने मात्र आपल्या गोलंदाजांचे कौतुक केले. रोहित म्हणाला की, एवढ्या खेळपट्टीनंतरही भारतीय गोलंदाज विंडीजला इतक्या कमी धावसंख्येवर रोखतील, असे वाटले नव्हते.

कमी धावसंख्या पाहून भारतीय संघाच्या व्यवस्थापनाने फलंदाजीचा क्रम बदलला आणि युवा खेळाडूंना संधी दिली. रोहित सलामीला आला नाही आणि त्याने शुभमन गिल, इशान किशनला डावाची सुरुवात करायला पाठवले. विराट कोहलीच्या जागी सूर्यकुमार यादव आला. हार्दिक पांड्याला चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आले. रोहित म्हणाला की, मला युवा खेळाडूंना संधी द्यायची होती, त्यामुळे फलंदाजीच्या क्रमात बदल केले. पण संघाचे पाच विकेट पडतील असे त्याला वाटले नव्हते.