जर आर. अश्विनने केला अनिल कुंबळेसारखा अप्रतिम कारनामा, तर टीम इंडियाच्या विजयावर होईल शिक्कामोर्तब!


भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना शेवटच्या दिवसावर पोहोचला आहे. भारताला मालिकेत क्लीन स्वीपची संधी आहे. विंडीज संघाला शेवटच्या दिवशी विजयासाठी आणखी 289 धावा करायच्या आहेत, तर टीम इंडियाला 8 विकेट्सची गरज आहे. भारताकडून सर्वाधिक नजरा रविचंद्रन अश्विनवर असतील.

स्टार ऑफस्पिनर अश्विनला पहिल्या डावात फारसे यश मिळाले नाही. त्याला केवळ एकच बळी मिळवता आला. मात्र, दुसऱ्या डावात अश्विनने आपली जादू दाखवत वेस्ट इंडिजच्या दोन्ही विकेट्स मिळवल्या आहेत.

आता शेवटच्या दिवशी भारताला 8 विकेट्स मिळवायच्या असतील, तर त्यात अश्विनची भूमिका सर्वात महत्त्वाची असेल आणि त्यासाठी अश्विनला तेच करावे लागेल, जे 16 वर्षांपूर्वी महान लेगस्पिनर अनिल कुंबळेने केले होते.

कुंबळेने डिसेंबर 2007 मध्ये मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका डावात 5 विकेट घेतल्या होत्या. त्याच्या कारकिर्दीतील ही 35वी आणि शेवटची ‘5 विकेट्स’ होती. अश्विनही आता त्याच्या जवळ पोहोचला आहे. अश्विनने 34 वेळा ही अप्रतिम कामगिरी केली आहे आणि 3 बळी मिळताच तो कुंबळेच्या भारतीय विक्रमाची बरोबरी करेल.

अश्विनने पहिल्या सत्रातच हा पराक्रम केला, तर भारताच्या विजयाची शक्यता वाढेल कारण शेवटच्या दिवशीही पावसाचा हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे. तसे, या मालिकेत अश्विनची कामगिरी सातत्याने चांगली आहे. पहिल्या कसोटीतही त्याने 12 विकेट्स घेतल्या होत्या.