टोमॅटोने शेतकऱ्याला बनवले करोडपती, एका दिवसात कमावले 18 लाखपर्यंत


देशात महागाईमुळे हाहाकार माजला आहे. दुधी, पडवळ, भेंडी, कांदा, बटाटा, वांगी, फणस, तोंडली यासह जवळपास सर्वच प्रकारच्या भाज्या महागल्या आहेत. मात्र टोमॅटोच्या भावात सर्वाधिक वाढ झाली आहे. त्याचा दर 200 रुपये किलोच्या पुढे गेला आहे. चंदीगडसह अनेक शहरांमध्ये टोमॅटो 350 रुपये किलोने विकला जात आहे. आगामी काळात टोमॅटो आणखी महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्या किमती आणखी वाढू शकतात.

पण या सगळ्यात विशेष म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्यात टोमॅटो घाऊक दरात खूपच स्वस्त झाले होते. त्याचा भाव मंडईत 3 रुपये किलोपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. व्यापाऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांकडून एक रुपया किलो दराने टोमॅटो खरेदी केले होते. अशा स्थितीत शेतकऱ्यांना अनेक क्विंटल टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यावे लागले. मात्र टोमॅटो महागल्याने महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचे नशीब पालटले आहे. टोमॅटो विकून ते कोट्यावधी रुपयांची कमाई करत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत, जो टोमॅटो विकून करोडपती झाला. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्याबद्दल आपण बोलणार आहोत, तो महाराष्ट्राचा रहिवासी आहे आणि त्याने अवघ्या एका महिन्यात टोमॅटोपासून एवढी कमाई केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तुकाराम भागोजी गायकर असे या शेतकऱ्याचे नाव असून ते पुणे जिल्ह्यातील जुन्नर गावचे रहिवासी आहेत. त्यांच्याकडे 18 एकर जमीन आहे. मुलगा आणि सून यांच्या मदतीने ते 12 एकरांवर टोमॅटोची लागवड करतात. या महागाईचा पुरेपूर फायदा तुकाराम भागोजी गायकर यांनी घेतला आहे. देशात टोमॅटोच्या किमतीत वाढ झाल्यावर त्यांनी आपल्या शेतातून टोमॅटो तोडून विकायला सुरुवात केली. गेल्या एका महिन्यात त्यांनी 13 हजार क्रेट टोमॅटोची विक्री केली आहे. यामुळे त्याला 1.25 कोटी रुपयांची कमाई झाली आहे.

दरम्यान एका क्रेटमध्ये 20 किलो टोमॅटो येतात. काल म्हणजेच शुक्रवारी तुकाराम भागोजी गायकर यांनी टोमॅटोचा एक क्रेट 2100 रुपयांना विकला. विशेष बाब म्हणजे त्यांनी काल एकूण 900 क्रेट टोमॅटोची विक्री केली. अशाप्रकारे त्यांनी एकाच दिवसात टोमॅटोपासून 18 लाखांची कमाई केली. त्याच वेळी, तुकाराम यांनी गेल्या महिन्यात टोमॅटोची प्रति क्रेट 1000 ते 2400 रुपये दराने विक्री केली. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यात तुकाराम भागोजी गायकर यांच्यासारखे 10 ते 12 शेतकरी टोमॅटो विकून श्रीमंत झाले आहेत. त्याचबरोबर बाजार समितीने एका महिन्यात टोमॅटोच्या विक्रीतून 80 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.