शिवम दुबेचे 3 वर्षांनंतर टीम इंडियात पुनरागमन, एमएस धोनीने दिले करिअरला नवे वळण


शिवम दुबेचा एकेकाळी भारतीय क्रिकेटमध्ये खूप दबदबा होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने जबरदस्त खेळ दाखवला आणि त्यानंतर टीम इंडियातही आला. मात्र चांगली कामगिरी न केल्याने त्याला संघातून वगळण्यात आले. पण आता शिवम दुबे भारतीय संघात परतला आहे. शिवमची सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे. यासह शिवम तब्बल तीन वर्षांनी टीम इंडियात परतला आहे.

बीसीसीआयने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी युवा खेळाडूंची निवड केली आहे. त्याचवेळी होणारा एकदिवसीय विश्वचषक हे त्याचे कारण आहे. ऋतुराज गायकवाडला संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. या संघात बहुतेक तेच खेळाडू दिसत आहेत, ज्यांना भारताचे भविष्य म्हटले जात आहे.

शिवम पहिल्यांदा टीम इंडियामध्ये आला, तेव्हा त्याच्याबद्दल बरीच चर्चा झाली होती. तो सर्वोत्कृष्ट अष्टपैलू बनू शकतो, असे त्याच्याबद्दल बोलले जात होते, पण त्याला यश आले नाही. भारतासाठी एक वनडे आणि नऊ टी-20 सामने खेळल्यानंतर त्याचा पत्ता कापला गेला. पण आता तो परतला आहे आणि याचे एक कारण महेंद्रसिंग धोनी आहे. शिवम आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. चेन्नईत आल्यानंतर शिवमच्या खेळात खूप सुधारणा झाली आहे. त्याची यंदाची कामगिरी हेच सांगते.

IPL-2023 मध्ये, शिवमने 16 सामन्यात 38 च्या सरासरीने 418 धावा केल्या, तीन अर्धशतके झळकावली. शिवमचे हे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट आयपीएल ठरले असून त्याचे श्रेय त्याने धोनीला दिले आहे. शिवमने आयपीएल-2023 दरम्यान सांगितले होते की धोनीने त्याला खूप प्रेरणा दिली आणि शिवमला त्याने न घाबरता खेळण्याची गरज असल्याचे सांगितले. शिवमने हेच केले आणि IPL-2023 मध्ये शानदार खेळ दाखवला.

शिवम आता टीम इंडियात परतला आहे. जरी हा संघ असा संघ आहे ज्यात संघाचे मुख्य खेळाडू नाहीत, कारण ते आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान एकदिवसीय विश्वचषकाची तयारी करणार आहेत. पण तरीही शिवमने येथे चांगली कामगिरी केली, तर तो मुख्य खेळाडूंसोबत टीम इंडियात खेळू शकतो. शिवममध्ये टॅलेंट आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. त्याच्या क्षमतेनुसार खेळण्याची गरज आहे. धोनीने जे सांगितले, ते शिवम करत आहे.