विक्रमी खेळी खेळल्यानंतर भावूक झाला यशस्वी जैस्वाल, म्हणाला – ही तर सुरुवात आहे


आपल्या पहिल्याच सामन्यात जगाच्या लक्षात राहील अशी छाप सोडणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल ही कामगिरी करण्यात यशस्वी ठरला आहे. विंडसर, डॉमिनिका येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात यशस्वीला वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण करण्याची संधी मिळाली, या डावखुऱ्या फलंदाजाने त्या संधीचा पूरेपुर फायदा घेतला.पहिल्याच सामन्यात यशस्वीने शतक झळकावले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 143 धावा करून यशस्वी नाबाद परतला. ही खेळी खेळल्यानंतर यशस्वी भावूक झाला.

या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यजमान संघाचे फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत आणि वेस्ट इंडिजचा संघ 150 धावांवर गारद झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने दोन गडी गमावून 312 धावा केल्या आहेत.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर यशस्वीने सांगितले की, ही खेळी त्याच्यासाठी खूप भावूक होती. तो म्हणाला की तो मैदानात मोकळेपणाने खेळण्यासाठी गेला होता, ज्यात तो यशस्वी झाला. शतक ठोकणे हा त्याच्यासाठी भावनिक क्षण आहे, ज्याचा त्याला अभिमान आहे. ही फक्त सुरुवात असून पुढे जाण्यासाठी सर्व काही करणार असल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला की, भारतीय संघात संधी मिळणे खूप कठीण आहे. इथपर्यंतच्या प्रवासासाठी त्याने कर्णधार रोहित शर्मा, भारतीय संघ व्यवस्थापन, सपोर्टचे आभार मानले.

यशस्वी म्हणाला की या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नव्हते, कारण खेळपट्टी अतिशय संथ आहे आणि आऊटफील्ड देखील संथ आहे आणि हवामान देखील खूप गरम आहे. त्याला आपल्या देशासाठी काहीतरी चांगले करायचे आहे, असे तो म्हणाला. एकावेळी एक चेंडू खेळण्यावर आपले लक्ष असल्याचे त्याने सांगितले. यशस्वीने सांगितले की, त्याला कसोटी क्रिकेट आवडते, त्याला या फॉरमॅटमधील आव्हाने आवडतात, जेव्हा चेंडू स्विंग होतो आणि सीम होतो, जे या फलंदाजाला आवडते.

यशस्वीने या खेळीतून अनेक विक्रम केले. यशस्वीची ही धावसंख्या भारताबाहेर पदार्पणाच्या कसोटी सामन्यात कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेली सर्वात मोठी धावसंख्या आहे. या बाबतीत त्याने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकले आहे. गांगुलीने 1996 मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध 133 धावांची खेळी केली होती. पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणारा यशस्वी भारताचा तिसरा सलामीवीर ठरला आहे. त्याच्या आधी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी हे काम केले होते. यशस्वीने रोहितसोबत पहिल्या विकेटसाठी 229 धावांची भागीदारी केली. आशियाबाहेर भारताकडून ही सर्वात मोठी सलामीची भागीदारी आहे.