Emerging Asia Cup : 20 चौकार, 108 धावा, कर्णधार यश धुलचा श्रीलंकेत दबदबा, भारत अ संघाचा पहिला विजय


कर्णधार यश धुल श्रीलंकेत दबदबा निर्माण केला आहे. इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेत भारतासाठी पहिल्याच सामन्यात त्याने झंझावाती शतक ठोकत त्याने भारताला 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवून दिला. कोलंबोमध्ये इमर्जिंग आशिया चषक खेळला जात आहे, ज्यातील तिसऱ्या सामन्यात यूएई अ संघ भारत अ संघासमोर होता. प्रथम फलंदाजी करताना UAE संघ 50 षटकात 9 विकेट गमावत 175 धावाच करू शकला.

भारत अ संघाने प्रथम 2 गडी गमावून 141 चेंडूत 176 धावांचे लक्ष्य गाठले. भारताने 8 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेला यूएई संघ भारतीय आक्रमणासमोर टिकू शकला नाही. भारतीय गोलंदाजांनी यूएईच्या फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची एकही संधी दिली नाही. युएईकडून अश्वंतने सर्वाधिक 46 धावा केल्या.

हर्षित राणाने 41 धावांत 4 बळी घेतले. तर नितीशकुमार रेड्डी आणि मानव यांना 2-2 यश मिळाले. प्रत्युत्तरात भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. भारताने दोन्ही सलामीवीर लवकर गमावले होते. साई सुदर्शन 8 आणि अभिषेक शर्मा 19 धावांवर बाद झाले. कर्णधार यश आणि निकिन जोस यांनी संघाची धुरा सांभाळली. दोघांनीही अप्रतिम फलंदाजी केली. यशने 84 चेंडूत नाबाद 108 धावा ठोकल्या, ज्यात त्याने 20 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर निकिनने 53 चेंडूत नाबाद 41 धावा केल्या.