ट्रेनचे इंजिन धक्का मारुन सुरू करता येईल का? समजून घ्या विज्ञानाच्या दृष्टिकोनातून


रस्त्यात गाडी किंवा बस-ट्रक बिघडली, तर धक्का देऊन सुरू होते, पण ट्रेन धक्का मारून सुरू करता येते का? सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिस आणि रेल्वे कर्मचारी धक्का मारुन ट्रेन सुरू करत असल्याचा दावा व्हिडिओमध्ये केला जात आहे, यावर रेल्वेने स्पष्टीकरण दिले आहे, पण खरंच असं होऊ शकते का? चला समजून घेऊया.

धक्का देऊन ट्रेन सुरू करता येईल का? हे जाणून घेण्यापूर्वी, ट्रक, बस किंवा कार एका धक्क्याने कशा सुरू होतात हे समजून घेतले पाहिजे. खरं तर, रस्त्यावरील वाहनांमध्ये, इंजिन आणि चाके यांच्यातील समन्वयाचे काम क्लच आणि गियर बॉक्सद्वारे केले जाते. थांबलेल्या कारला ढकलले जाते आणि कार जरा वेगात असताना ड्रायव्हर क्लचमधून पाय काढतो, तेव्हा गिअरबॉक्स इंजिनच्या क्रँकशाफ्टला जोर लावतो आणि ते वेगाने फिरू लागते.

धक्का मारुन ट्रेन कधीच सुरू होऊ शकत नाही. याचे कारण म्हणजे ट्रेनमध्ये ना क्लच आहे ना गिअरबॉक्स. रेल्वे अभियंता अनिमेश कुमार यांच्या मते, गिअर बॉक्स नसल्यामुळे रेल्वे इंजिनचा क्रॅंकशाफ्ट फिरू शकत नाही. इंजिन फिरेपर्यंत सुरू होणार नाही. जर अनेकांनी एकत्र येऊन ताकद लावली तर ते ट्रेन थोडी पुढे सरकवू शकतात किंवा मागे घेऊ शकतात. याशिवाय काही करू शकत नाही.


विज्ञानाच्या दृष्टिकोनातून समजून घेतल्यास, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांचे ट्रान्समिशन यांत्रिक असते, म्हणजे क्लच आणि गियर बॉक्स, तर ट्रेनचे इंजिन पूर्णपणे इलेक्ट्रिक ट्रान्समिशनवर चालते. त्यामुळे कधी वाटेत ट्रेनचे इंजिन अचानक थांबले आणि आपोआप सुरू झाले नाही, तर बॅटरीवर जंप करून गाडी सुरू केली जाते.

आता व्हायरल व्हिडिओकडे परत येत असताना, रेल्वेने दावा केला आहे की व्हायरल होणारा व्हिडिओ ट्रेन क्रमांक 12703 फलकनुमा एक्स्प्रेसचा आहे. रेल्वेच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ 7 जुलैचा आहे, जेव्हा ट्रेनच्या एका डब्याला आग लागली होती. तो वाचवण्यासाठी जवान तो डबा बाकीच्या डब्यांपासून वेगळा करत आहेत. त्यामुळेच ट्रेनला धक्का दिला जात असल्याचे दिसत आहे.