On This Day in Cricket : 214 मिनिटांत दुहेरी शतक, 93 वर्षांपासून अबाधित आहे हा विश्वविक्रम


ऑस्ट्रेलियन उजव्या हाताचे फलंदाज सर डॉन ब्रॅडमन हे सर्वकाळातील महान फलंदाजांमध्ये गणले जातात. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत ब्रॅडमन यांनी अशा अनेक खेळी खेळल्या ज्या इतिहासाच्या पानात नोंदल्या गेल्या आहेत. असाच एक डाव ब्रॅडमन यांनी या दिवशी म्हणजे 11 जुलै 1930 मध्ये खेळला होता. त्यांची खेळी इतकी नेत्रदीपक होती की 93 वर्षांनंतरही या खेळीची कोणीही बरोबरी करू शकला नाही आणि ब्रॅडमन यांनी केलेला विक्रम आजही अबाधित आहे.

इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. ऍशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना 11 ते 15 जुलै दरम्यान लीड्समधील हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी ब्रॅडमन यांनी अशी फलंदाजी केली की इंग्लंडचा संघ पाहतच राहिला.

विकेटवर आरामात धावा करणारा फलंदाज अशी ब्रॅडमन यांची ओळख असली, तरी या दिवशी ब्रॅडमन वेगळ्याच रंगात होते. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी त्रिशतक झळकावले होते. ब्रॅडमन यांनी या सामन्यात उपाहारापूर्वीच शतक झळकावले होते. ब्रॅडमनने या सामन्यात अवघ्या 214 मिनिटांत दुहेरी शतक पूर्ण केले. यासह ब्रॅडमन कसोटीत कमीत कमी वेळेत द्विशतक झळकावणारे फलंदाज ठरले. त्यांचा विक्रम आतापर्यंत एकाही फलंदाजाला मोडता आलेला नाही. त्यांच्यानंतर 214 मिनिटांत एकाही फलंदाजाला द्विशतक करता आले नाही.

ब्रॅडमन यांनी पहिला दिवस 309 धावांसह संपवला. यासह ब्रॅडमन हे कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी त्रिशतक करणारे पहिले आणि एकमेव फलंदाज ठरले. या सामन्यात ब्रॅडमन यांनी 334 धावांची खेळी केली. यासाठी त्यांनी 448 चेंडूंचा सामना केला आणि 46 चौकार मारले. ब्रॅडमन यांच्या कारकिर्दीतील ही सर्वोच्च धावसंख्याही आहे.

ब्रॅडमनच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 566 धावा केल्या. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात केवळ 391 धावाच करू शकला. यजमान संघाला फॉलोऑन वाचवता आला नाही. ऑस्ट्रेलियाने त्यांना फॉलोऑन दिला आणि सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडने तीन गडी गमावून 95 धावा केल्या आणि सामना अनिर्णित राहिला.