भारतीय महिला क्रिकेट संघाची चार महिन्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. हा संघ गेल्या चार महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही आणि आता हा संघ बांगलादेशविरुद्ध लढण्यासाठी सज्ज झाला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर असून रविवारपासून टी-20 मालिकेने दौऱ्याची सुरुवात करणार आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना मीरपूरच्या शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
IND W vs BAN W: 4 महिन्यांनंतर मैदानात उतरणार टीम इंडिया, बांगलादेशमध्ये होणार आशियाई खेळांची तयारी
भारतीय महिला संघाने या वर्षी फेब्रुवारीमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत खेळला होता, ज्यामध्ये त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर संघाच्या खेळाडूंनी वुमन्स प्रीमियर लीगमध्ये भाग घेतला, परंतु त्यानंतर त्यांनी कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. मालिकेतील दुसरा सामना 11 जुलैला आणि तिसरा सामना 13 जुलैला मीरपूरमध्येच होणार आहे.
या दौऱ्यावर निवड समितीने काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली. संघाची तुफानी फलंदाज- यष्टिरक्षक रिचा घोष आणि वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूर फिटनेसच्या समस्येमुळे या दौऱ्यावर नाहीत. शिखा पांडेसारखी वेगवान गोलंदाजही या दौऱ्यात संघासोबत नाही. अशा परिस्थितीत निवड समितीने राशी कनोजिया, उमा छेत्री, मिन्नू मणी, अनुषा यांची संघात निवड केली आहे. या दौऱ्यात या खेळाडूंना आपली छाप सोडण्याची संधी आहे. ऋचा घोषच्या अनुपस्थितीत भारताकडे यास्तिका भाटिया आणि उमा या दोन यष्टीरक्षक आहेत.पहिल्या सामन्यात संघ अनुभवी भाटियासोबत जाण्यास प्राधान्य देऊ शकतो.
या दौऱ्यावर राधा यादव आणि राजेश्वरी गायकवाड यांच्यासारखे अनुभवी फिरकीपटूही नाहीत. या दोघांच्या जागी अनुषा आणि राशीला पदार्पणाची संधी मिळू शकते.
रिचा घोषच्या अनुपस्थितीमुळे संघासमोर फिनिशरचा प्रश्न निर्माण झाला आहे. दीप्ती शर्माच्या रूपाने संघाकडे एक पर्याय आहे पण दीप्ती या भूमिकेला पूर्वी न्याय देऊ शकलेली नाही. टीम पूजा वस्त्राकर हिच्यावर आशा पल्लवित करू शकते. यस्तिका भाटियाने फलंदाजीची सुरुवात केली, तरी शेफाली वर्मा, स्मृती मानधना यांच्या उपस्थितीमुळे तिला येथे संधी मिळणार नाही, त्यामुळे संघ तिला फिनिशर म्हणून आजमावू शकतात. या मालिकेतून मोनिका पटेल आणि मेघना सिंग देखील कमबॅक करत आहेत. या दोघीही चमकदार कामगिरी करून संघात आपले स्थान पक्के करण्याचा प्रयत्न करतील.
या दौऱ्यावर संघाची सलामीची जोडी शेफाली वर्मा आणि मानधना यांच्यावर नजर असेल. दोघीही टी-20मधील सर्वोत्तम फलंदाज आहेत. शेफाली तिच्या झंझावाती फलंदाजीसाठी ओळखली जाते आणि या दौऱ्यावर तिने वेगवान खेळी खेळली, तर नवल वाटणार नाही. मंधानावर संघाची फलंदाजी टिकून आहे. तिच्यासह कर्णधार हरमनप्रीत कौर ही संघाच्या फलंदाजीची धुरा मानली जाते. संघाला जिंकायचे असेल तर मंधाना आणि हरमनप्रीतची बॅट तळपणे आवश्यक आहे.
बीसीसीआयने महिला क्रिकेट संघाला सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्यास मान्यता दिली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने हा दौरा हरमनप्रीत कौरच्या संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी या दौऱ्यातून संघातील खेळाडू पुन्हा लय मिळवण्याचा प्रयत्न करतील. तसेच कर्णधार योग्य संघ संयोजन शोधण्याचा प्रयत्न करेल.
भारतीय महिला संघ जेव्हा बांगलादेश दौऱ्यावर जाईल, तेव्हा त्यांच्यासोबत मुख्य प्रशिक्षक असेल, अशी अपेक्षा होती, प्रशिक्षकाशिवाय संघ जात नसला, तरी कायमस्वरूपी प्रशिक्षक नाही. नौशीन अल खदीर यांची बांगलादेश दौऱ्यासाठी अंतरिम प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारताच्या 19 वर्षांखालील महिला संघाने त्यांच्या प्रशिक्षकपदाखाली यंदाचा T20 विश्वचषक जिंकला होता.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सीएसीने मुंबईचा माजी कर्णधार आणि सर्वोत्तम फलंदाज अमोल मजुमदार यांचे नाव संघाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी दिले असले, तरी ते अद्याप निश्चित झालेले नाही. अशा स्थितीत अंतरिम प्रशिक्षकासोबतच संघाला बांगलादेश दौऱ्यावर जावे लागणार आहे.
कोणत्याही संघाला त्याच्या घरच्या मैदानावर पराभूत करणे सोपे नाही. अशा परिस्थितीत बांगलादेशला घरच्या मैदानावर पराभूत करणे टीम इंडियासाठी सोपे नसेल. या संघात भारताला घरच्या मैदानावर पराभूत करण्याची ताकद आहे. यजमान संघाला हलक्यात घेण्याची चूक भारतीय संघ करू शकत नाही. या मालिकेत संघाची अनुभवी वेगवान गोलंदाज जहांआरा आलमही नाही. तसेच फरगाना हकलाही संघात स्थान मिळालेले नाही. तिची स्टँडबायमध्ये निवड करण्यात आली आहे. या दोघांशिवाय बांगलादेशचा संघ थोडा दुबळा नक्कीच होईल, पण तरीही टीम इंडियाला सावध राहावे लागेल.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे-
भारत – हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, यास्तिका भाटिया, देविका वैद्य, उमा छेत्री (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, एस. मेघना, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, अंजली सरवानी, मोनिका पटेल, राशी कनोजिया. अनुषा बरेड्डी, मिन्नू मणी.
बांगलादेश – निगार सुलतान (कर्णधार), नाहिदा अख्तर, दिलारा अख्तर, शाथी राणी, शमीमा सुलतान, शोभना मोस्त्री, मुर्शिदा खातून, शोरना अख्तर, रितू मोनी, दिशा बिस्वास, मारुफा अख्तर, संजिदा अख्तर, मेघला, राबेया खान, सुलतान खातून खातून, फहिमा खातून.