Tom Cruise : वयाच्या 14 व्या वर्षापर्यंत बदलल्या 15 शाळा, लहानपणी ख्रिश्चन धर्मगुरु बनणार कसा बनला जगातील सर्वात मोठा स्टार


हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझची मोहिनी वेगळीच आहे. जगभरात लोकप्रियता मिळविणाऱ्या व्यक्तिमत्त्वांपैकी हा एक अभिनेता आहे. प्रत्येक देशातील लोक त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहतात. या अभिनेत्याने आपल्या प्रतिभेने सर्वांना प्रभावित केले आणि आज जगात क्वचितच असा कोणी असेल, ज्याला टॉम क्रूझचे नाव माहित नसेल. त्याचा नवा चित्रपट येणार आहे. मिशन इम्पॉसिबल डेड रेकनिंग पार्ट 1 असे या चित्रपटाचे नाव आहे.

मिशन इम्पॉसिबल चित्रपटाने टॉम क्रूझला ओळख दिली. आता अभिनेता या चित्रपटाचा 7 वा भाग घेऊन येत आहे. त्याच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया. टॉम क्रूझचा जन्म 3 जुलै 1962 रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला. अभिनेत्याच्या वडिलांना त्यांच्या व्यवसायामुळे खूप फिरावे लागायचे. याच कारणामुळे अभिनेत्याला वयाच्या 14 व्या वर्षापर्यंत 15 वेळा शाळा बदलावी लागली. यानंतर जेव्हा अभिनेत्याच्या आईने दुसरे लग्न केले, तेव्हा त्याचे कुटुंब स्थिरावलं. जेव्हा अभिनेता दहावीत होता, तेव्हा त्याला ख्रिश्चन धर्मगुरु बनायचे होते. पण हळूहळू त्याचा विचार बदलला आणि अभिनयाची आवड निर्माण झाली.

यासाठी टॉम क्रूझने वयाच्या 18 व्या वर्षीच आपले शिक्षण अर्धवट सोडले आणि त्याने अभिनय करिअरकडे पूर्ण लक्ष केंद्रित केले. टॉम क्रूझने 1981 मध्ये ‘एंडलेस लव्ह’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटातूनच अभिनेता आपली छाप सोडू शकला. यानंतर त्याने द आउटसाइडर्स, टॉप गन, द कलर ऑफ मनी, कॉकटेल, रेन मॅन आणि द फर्म सारख्या चित्रपटात काम केले.

पण 1996 मध्ये आलेल्या ‘मिशन इम्पॉसिबल’ चित्रपटाने त्याचे नशीब बदलले. या चित्रपटामुळे तो जगभरात लोकप्रिय झाला. या चित्रपटाचे आणखी दोन भाग येत्या काळात प्रदर्शित होणार आहेत. मिशन इम्पॉसिबल डेड रेकनिंग पार्ट 1 हा 12 जुलै 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे, तर दुसरीकडे त्याचा पुढील भाग पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये येईल.