Mumbai : चोरीला गेला 6000 किलोचा लोखंडी पुल; बनवणाऱ्या कंपनीचे कामगार निघाले चोर, चौघांना अटक


मुंबई पोलिसांनी शहराच्या पश्चिम उपनगरातील नाल्यावरील 6,000 किलोचा लोखंडी पूल चोरल्याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. बांगूर नगर पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मालाड (पश्चिम) मध्ये 90 फूट लांबीची मेटल स्ट्रक्चर युटिलिटी कंपनी अदानी इलेक्ट्रिसिटीने मोठ्या इलेक्ट्रिक केबल्स पास करण्यासाठी लावली होती. ते म्हणाले की, नाल्यावर कायमस्वरूपी पूल बांधल्यानंतर काही महिन्यांपूर्वी या भागातील तात्पुरती रचना अन्य ठिकाणी हलविण्यात आली. 26 जून रोजी तात्पुरता पूल बेपत्ता असल्याचे आढळून आल्याने वीज कंपनीने पोलिसांत तक्रार दाखल केली, असे अधिकाऱ्याने सांगितले.

तपासादरम्यान पोलिसांना असे आढळून आले की, पुलला शेवटचे 6 जून रोजी पाहिले होते. घटनास्थळी कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे, पोलिसांनी आजूबाजूच्या भागात लावलेल्या पाळत ठेवणाऱ्या कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन केले आणि 11 जून रोजी एक मोठे वाहन पुलाच्या दिशेने जात असल्याचे दिसले, असे अधिकाऱ्याने सांगितले. यानंतर पोलिसांनी वाहनाचा नोंदणी क्रमांकावरून शोध घेतला.

त्या वाहनात गॅस कटिंग मशीन होती, ज्याचा उपयोग पूल पाडण्यासाठी आणि 6,000 किलो वजनाचे लोखंड चोरण्यासाठी करण्यात आले होते, असे अधिकारी म्हणाले. अधिक तपास केल्यानंतर पोलिसांनी पुलाच्या बांधकामाचे कंत्राट दिलेल्या कंपनीच्या एका कर्मचाऱ्याचा शोध घेतला. अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी गेल्या आठवड्यात कर्मचारी आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली होती. घटनास्थळावरून चोरीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.