IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिज संघाची घोषणा, टी-20मध्ये द्विशतक झळकवणाऱ्याची संघात वापसी


भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पहिली कसोटी 12 ते 16 जुलै दरम्यान डॉमिनिका येथे खेळवली जाणार असून या कसोटीसाठी वेस्ट इंडिजने आपला संघ जाहीर केला आहे. डावखुरा फलंदाज कर्क मॅकेन्झी याचा प्रथमच वेस्ट इंडिज संघात समावेश करण्यात आला आहे. तर T20 मध्ये द्विशतक झळकावणारा रहकीम कॉर्नवॉल देखील परतला आहे. कॉर्नवॉलने त्यांची शेवटची कसोटी नोव्हेंबर 2021 मध्ये खेळली होती.

19 वर्षाखालील विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत 99 धावांवर असताना युवा फलंदाज मॅकेन्झी प्रसिद्धीच्या झोतात आला, पण शतकासाठी एक धावा हवी असताना त्याला दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावे लागले. न्यूझीलंडच्या खेळाडूंनी त्याला उचलून स्ट्रेचरवर नेले. त्याच्याशिवाय अॅलिक अथानाजलाही पहिल्यांदा वेस्ट इंडिज संघात संधी मिळाली आहे.

डावखुरा फिरकी गोलंदाज जोमेलनेही पुनरागमन केले आहे. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला नव्हता आणि गुडाकेश मोती दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. वेस्ट इंडिज संघाच्या निवडकर्त्याने सांगितले की मॅकेन्झी आणि अॅलिक यांनी अलीकडेच बांगलादेश विरुद्ध अ दौऱ्यात उत्कृष्ट कामगिरी केली होती. दोन्ही युवा खेळाडू या संधीस पात्र होते.

भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या नव्या चक्रात आपल्या मोहिमेची सुरुवात करणार असल्याने वेस्ट इंडिजच्या या मालिकेकडे लक्ष लागले आहे. भारतीय संघ डॉमिनिकाला पोहोचला आहे, तर कॅरेबियन संघ रविवारी दाखल होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ही कसोटी ऐतिहासिक ठरणार आहे, कारण दोघांमध्ये 100 वा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

कॉर्नवॉलबद्दल सांगायचे तर, त्याने 2019 मध्ये भारताविरुद्धच कसोटी पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 9 कसोटी खेळल्या आहेत, ज्यात त्याने 2 अर्धशतक केले आहेत. 140 किलो वजन असलेल्या कॉर्नवॉलने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये स्थानिक स्पर्धेत टी-20मध्ये द्विशतक झळकावले होते. त्याने अटलांटा ओपनमध्ये 77 चेंडूत नाबाद 205 धावांची धडाकेबाज खेळी खेळली.

संघ: क्रेग बेथवेट, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक, टी चंद्रपॉल, रहकीम कॉर्नवॉल, जोशुआ डी सिल्वा, शॅनन गॅब्रिएल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, किर्क मॅकेन्झी, रेयॉन, केमार रोच, जोमेल