एकाच एकदिवसीय सामन्यात शतकासह 5 किंवा त्याहून अधिक बळी घेणारे 5 क्रिकेटपटू


क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. त्यांना फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही योगदान द्यावे लागते. इयान बोथम ते कपिल देव आणि इम्रान खान यांसारखे अनेक मोठे अष्टपैलू खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. जॅक कॅलिस आणि शेन वॉटसन यांचीही महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणना होते. मात्र एकाच वनडेत शतकी खेळीसह 5 बळी घेण्याचा पराक्रम यापैकी कोणालाही करता आलेला नाही. आज आम्ही तुम्हाला अशा 5 क्रिकेटर्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी एकाच वनडेत शतकी खेळीसोबतच 5 किंवा त्याहून अधिक विकेट्सही घेतल्या.

विव्ह रिचर्ड्स
वेस्ट इंडिजचे महान विव्ह रिचर्ड्स हे असे करणारा पहिला क्रिकेटर होता. 1987 मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रिचर्ड्सने 113 चेंडूत 119 धावा केल्या होत्या. गोलंदाजीतही त्याने 41 धावांत 5 बळी घेतले. वेस्ट इंडिजने हा सामना 95 धावांनी जिंकला होता.

पॉल कॉलिंगवुड
यामध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार पॉल कॉलिंगवूडच्या नावाचाही समावेश आहे. 2005 मध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध ट्रेंट ब्रिज येथे 86 चेंडूत 112 धावा केल्या होत्या. गोलंदाजीचा विचार केला, तर कॉलिंगवूडने 31 धावांत 6 बळी घेतले.

रोहन मुस्तफा
यूएईच्या रोहन मुस्तफाच्या नावावरही एकाच वनडेत शतक आणि 5 विकेट्स आहेत. त्याने 2017 मध्ये PNG विरुद्ध 125 चेंडूत 109 धावांची खेळी केली होती. गोलंदाजीत 5 फलंदाज अवघ्या 25 धावांत बाद केले. मुस्तफा याचा जन्म पाकिस्तानात झाला. त्याने यूएईचे कर्णधारपदही भूषवले आहे.

अमेलिया केर
न्यूझीलंडची अमारिया केर ही एकमेव महिला क्रिकेटपटू आहे, जिने वनडेमध्ये 5 विकेटसह शतक झळकावले आहे. तिने 2018 मध्ये आयर्लंडविरुद्ध 232 धावांची खेळी केली होती. गोलंदाजीत अमेलियाने अवघ्या 17 धावांत 5 बळी घेतले. एकाच वनडेत द्विशतक आणि 5 विकेट घेणारी ती जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे.

बेस डी लीड
आता या यादीत नेदरलँडच्या बास डी लीडेचेही नाव जोडले गेले आहे. स्कॉटलंडविरुद्धच्या विश्वचषक पात्रता फेरीत त्याने गोलंदाजीत 52 धावांत 5 बळी घेतले. त्यानंतर 92 चेंडूत 123 धावा फटकावल्या. त्याच्या या कामगिरीमुळे नेदरलँड्सने 4 विकेट्सने विजय मिळवला आणि विश्वचषकाचे तिकीटही मिळवले.