MS Dhoni : धोनी शेतात करतो सेंद्रिय शेती, व्हॉट्सअॅपवर ऑर्डर करून मागवू शकता भाजीपाला, फळे आणि दूध


जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि रांचीचा राजकुमार महेंद्रसिंग धोनी 7 जुलै रोजी आपला 42 वा वाढदिवस साजरा करणार आहे. माहीचा क्रिकेटशी असलेला संबंध आणि त्याचे यश साऱ्या जगाने पाहिले आहे. क्रिकेट हे धोनीचे पहिले प्रेम आहे असे म्हटले जाते, पण याशिवाय धोनीच्या इतर छंदांबद्दल बोलायचे झाले तर त्याचे वाहनांवरील प्रेम सर्वात आधी येते. वाहनांच्या कलेक्शनमध्ये धोनीकडे Hummer H-2, Porsche 911, Ferrari GT-5990, Jeep Grand Cherokee Trackhawk, Land Rover 3, Audi Q7, Confederate Hellcat X32, Harley Davidson Fatboy, Kawasaki Ninja ZX 14 यासह सुमारे दोन डझन वाहने आहेत. विविध कंपन्यांच्या बाईक्स आणि लक्झरी कार त्याच्या ताफ्यात आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनीने सेंद्रिय शेतीला चालना देण्याच्या उद्देशाने रांचीच्या नगडी पोलीस स्टेशन हद्दीतील सेंबो गावात ईजा फार्म नावाच्या 43 एकर परिसरात सेंद्रिय शेती सुरू केली. स्ट्रॉबेरी, सिमला मिरची, ड्रॅगन फ्रूट, टरबूज, दुधी, भेंडी, ब्रोकोली, टोमॅटो आणि इतर अनेक भाज्यांसह अनेक प्रकारच्या भाज्यांची मोठ्या प्रमाणावर आणि सेंद्रिय पद्धतीने माहीच्या शेतात लागवड केली जाते.

फार्ममध्ये पाळली जाते कडकनाथ जातीची कोंबडीही
यासोबतच धोनीच्या फार्ममध्ये कडकनाथ प्रजातीची कोंबडी मोठ्या प्रमाणात पाळली जात आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी बर्ड फ्लूची लागण झाल्याने अनेक कोंबड्या नष्ट झाल्या होत्या. कडकनाथ कोंबडी व्यतिरिक्त, धोनीच्या फार्ममधून अंडी देखील मोठ्या प्रमाणात पुरवली जातात, जी ईजा फार्मच्या व्हॉट्सअॅप ग्रुप नंबरवर ऑर्डर देऊन सहज मिळवता येतात. यासोबतच इजा फार्मच्या आउटलेटवरही त्याची विक्री केली जाते.

धोनीच्या फार्ममध्ये कुक्कुटपालनाव्यतिरिक्त भारतीय जातीच्या सुमारे 300 गायी, देशी गिर गाय, सेहवाल आणि फ्रिसन जातीच्या गायींचे पालनपोषण करण्यात येते, ज्यांचे दूध ईजा फार्मच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर किंवा ईजा फार्मच्या स्टोअरवरून ऑर्डर करून सहज खरेदी करता येईल. यासोबतच घरपोच दुधाचीही व्यवस्था दुकानातून केली जाते.

भाजीपाला, फळे आणि कुक्कुटपालन केल्यानंतर धोनी आता आपल्या शेतात मासे पाळत आहे. मत्स्यशेतीसाठी खास दोन मोठे तलाव बांधण्यात आले असून, त्यामध्ये रहू, कटला आणि तेलपिया नावाच्या माशांच्या प्रजातींचे संगोपन केले जात आहे. माशांचा आकार लहान असल्याने त्यांची खरेदी-विक्री सध्या होत नाही.

धोनीच्या गावात आहे 43 एकरमध्ये फार्म हाऊस
महेंद्रसिंग धोनीच्या सैंबो गावात 43 एकरांवर पसरलेल्या शेतात उगवलेली भाजीपाला आणि फळे ईजा फार्म नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ऑर्डर देऊन किंवा ईजा फार्म नावाच्या ओपन आउटलेटला भेट देऊन सहजपणे मिळवता येतात. राजधानी रांची येथील लालपूर येथील सुजाता चौक आणि इजा फार्मच्या दुकानांव्यतिरिक्त डेली मार्केटमध्ये असलेल्या दुकानातून फळे आणि भाजीपाला विकला जात आहे.

शेतीचे काम सांभाळतो धोनीचा मोठा भाऊ नरेंद्र सिंग
यासोबतच धोनीच्या शेतात पिकवलेली फळे आणि भाजीपाला ऑल सीझन फार्म फ्रेश एजन्सीमार्फत दुबई आणि इतर आखाती देशांमध्ये पाठवला जातात. धोनीच्या इजा फार्ममध्ये सध्या सुमारे 150 लोक काम करत आहेत. धोनीचा मोठा भाऊ नरेंद्रसिंग धोनी आणि त्याचे जवळचे मित्र फार्म हाऊसची जबाबदारी सांभाळत आहेत.