पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सईद अजमलचा धक्कादायक दावा, सचिनबद्दल सांगितली ही मोठी गोष्ट


2011 च्या विश्वचषकात भारत विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सचिन तेंडुलकर विरुद्धच्या एका वादग्रस्त निर्णयाबाबत पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज सईद अजमलने मोठा खुलासा केला आहे. हा सामना मोहली येथे खेळला गेला. सचिन तेंडुलकर 23 धावांवर खेळत असताना ही घटना घडली. त्याचवेळी सईदचा एक चेंडू सचिनच्या पॅडला लागला की तो स्टंपच्या अगदी समोर होता. जोरदार अपील होते, त्यामुळे पंच इयान गोल्ड यांनी लगेच बोट वर केले. तेंडुलकरने रिव्ह्यू घेतला, तेव्हा चेंडू लेग स्टंपला दिसत नव्हता आणि या गोष्टीमुळे सचिन तेंडुलकरला पुढचा डाव खेळण्याची संधी मिळाली. आता या घटनेला 12 वर्षांनंतर सईद अजमलने सचिनला वाचवण्यासाठी या रिप्लेच्या शेवटच्या दोन फ्रेम्स कापल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.

अजमलने पाकिस्तानमधील पॉडकास्ट संभाषणात सांगितले की, 2011 मध्ये भारतात झालेल्या वर्ल्ड कपमध्ये मी खेळलो. तो म्हणाला की तुम्हाला ती विकेट आठवत असेल, तर मी म्हणेन की अंपायर आणि मी अजूनही म्हणतो की सचिन आऊट होता. “तो” व्हिडिओच्या शेवटच्या दोन फ्रेम्स कट झाल्या, त्यामुळे चेंडू लेग स्टंपला चुकला. या दोन्ही फ्रेम दाखविल्या असत्या तर चेंडू थेट मधल्या यष्टीवर आदळल असल्याचा दिसला असता.

सचिनने रिव्ह्यू टाळल्याचा परिणाम असा झाला की सचिन तेंडुलकरने वैयक्तिक 23 धावांवर जीवदान मिळाल्यानंतर 115 चेंडूत 85 धावा केल्या आणि भारताच्या विजयात त्याची खेळी खूप महत्त्वाची होती. भारताने चांगली धावसंख्या उभारून पाकिस्तानचा 29 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताने निर्धारित 50 षटकात 9 विकेट गमावत 260 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 231 धावांवर ऑलआऊट झाला. 2011 हे विश्वचषक वर्ष अजमलच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम वर्ष ठरले. तो कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. त्या वर्षी अजमलने 8 सामन्यात 50 विकेट घेतल्या.