Duleep Trophy : नवव्या क्रमांकावर फलंदाजी करत 75 चेंडूत चौकार आणि षटकारांसह कुटल्या 102 धावा


भारतीय क्रिकेट संघ सध्या मैदानापासून दूर आहे, पण भारतात क्रिकेटचा हंगाम सुरूच आहे. देशांतर्गत हंगामातील पहिली स्पर्धा दुलीप करंडक सुरू झाली आहे. वेगवेगळ्या झोनमध्ये होत असलेल्या या स्पर्धेत अनेक देशांतर्गत क्रिकेटपटू आपली ताकद दाखवत आहेत. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी अशाच एका खेळाडूने आपल्या बॅटच्या जोरावर सर्वांनाच चकित केले. उत्तर विभागाकडून खेळणारा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येत अवघ्या 75 चेंडूत शतक झळकावले.

28 जूनपासून उत्तर विभाग आणि उत्तर-पूर्व विभाग यांच्यातील स्पर्धा सुरू झाली. दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेशातील काही अनुभवी खेळाडूंसमोर नॉर्थ-इस्टचा संघ तुलनेने कमकुवत होता. अशा स्थितीत उत्तरेचे वर्चस्व पाहणे आधीच अपेक्षित होते आणि तसेच झाले. तरीही नवव्या क्रमांकाचा फलंदाज झंझावाती फलंदाजी करून दहशत निर्माण करेल, असे क्वचितच कुणाला वाटले असेल.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी हर्षित राणाने स्फोटक खेळी केली. राणाने अवघ्या 75 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याचे प्रथम श्रेणीतील कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे. केवळ 21 वर्षांच्या दिल्लीच्या या गोलंदाजाने या खेळीपूर्वी केवळ 5 सामने खेळले होते, ज्यात त्याच्या बॅटमधून केवळ 152 धावा निघाल्या होत्या.

हर्षितने केवळ 86 चेंडूत 122 धावांची नाबाद खेळी खेळली, ज्यात त्याच्या बॅटमधून 12 चौकार आणि 9 षटकार आले. म्हणजेच त्याने केवळ षटकार आणि चौकारांसह 102 धावा केल्या.

दिल्लीच्या या युवा खेळाडूने अलीकडेच आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून पदार्पण केले. राणाने आपल्या वेगवान आणि उसळत्या चेंडूंनी फलंदाजांना अडचणीत आणले आणि आपली छाप पाडली. आता त्याने बॅटनेही आपली क्षमता दाखवली आहे.

हर्षितपूर्वी उत्तर विभागाच्या इतर फलंदाजांनीही धावा केल्या. सलामीवीर ध्रुव शौरीने सामन्याच्या पहिल्याच दिवशी 135 धावा केल्या. दुसऱ्या दिवशी, हर्षितच्या आक्रमणाआधी, हरियाणाच्या 19 वर्षीय अष्टपैलू निशांत सिंधूनेही 150 धावांची खेळी केली. त्याच्याच जोरावर उत्तर विभागाने 8 गडी गमावून 540 धावांवर पहिला डाव घोषित केला.