Ashes 2023 : स्टीव्ह स्मिथने लॉर्ड्सवर घेतला एजबॅस्टनचा ‘बदला’, शतक ठोकून मोडला पॉंटिंगचा विश्वविक्रम


स्टीव्ह स्मिथला कसोटी क्रिकेटमध्ये रोखणे अशक्य आहे. एजबेस्टन कसोटीत अपयशी ठरलेल्या या अनुभवी फलंदाजाने लॉर्ड्स कसोटीत शानदार शतक ठोकले. उजव्या हाताचा फलंदाज स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमधील आपले 32 वे शतक झळकावले. स्टीव्ह स्मिथ लॉर्ड्सच्या कठीण खेळपट्टीवर टिकलाच नाही, तर त्याने आपल्या अप्रतिम तंत्राचा वापर करून ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत आणून ठेवले. पहिल्या दिवशी स्मिथ 85 धावांवर नाबाद होता आणि दुसऱ्या दिवशी त्याने आपल्या स्कोअरमध्ये आणखी 15 धावांची भर घालून शतक पूर्ण केले.

एजबॅस्टन कसोटीच्या दोन्ही डावात स्टीव्ह स्मिथ अपयशी ठरला होता. पहिल्या डावात 16 आणि दुसऱ्या डावात 6 धावा करून तो बाद झाला. पण लॉर्ड्समध्ये त्याने शक्य ते सर्व प्रयत्न केले. लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात स्मिथने 110 धावांची खेळी केली होती. त्याला जोश टँगने बाद केले. मात्र, बाद होण्यापूर्वी त्याने अनेक मोठे पराक्रम केले.

स्टीव्ह स्मिथ हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 32 शतके करणारा खेळाडू आहे. त्याने 174 व्या डावात ही कामगिरी केली. स्मिथने 176 डावात 34 शतके झळकावणाऱ्या रिकी पॉन्टिंगचा विक्रम मोडला.

या शतकासोबतच स्टीव्ह स्मिथने अॅशेसमध्ये आणखी एक मोठा पराक्रम केला आहे. स्मिथने अॅशेस मालिकेतील 12वे शतक झळकावले आणि यासह त्याने जॅक हॉब्सची बरोबरी केली. अॅशेसमध्ये सर्वाधिक 19 शतके झळकावण्याचा विक्रम ब्रॅडमनच्या नावावर आहे.

लॉर्ड्सवर शतक झळकावताच स्टीव्ह स्मिथने इंग्लंडमधील कारकिर्दीतील 8 वे कसोटी शतक झळकावले. इंग्लंडमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा तो दुसरा सर्वात यशस्वी परदेशी फलंदाज आहे. ब्रॅडमन यांनी इंग्लंडमध्ये 11 शतके झळकावली आहेत.

सध्याच्या काळातील सर्व फलंदाजांमध्ये सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा फलंदाज स्टीव्ह स्मिथ आहे. तसेच, त्याने कसोटी शतकांच्या बाबतीत स्टीव्ह वॉची बरोबरी केली आहे. पाँटिंगने ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक 41 कसोटी शतके झळकावली आहेत.

पहिली कसोटी जिंकणारा ऑस्ट्रेलियन संघ आता दुसऱ्या कसोटीत स्टीव्ह स्मिथच्या शतकाच्या जोरावर फ्रंटफूटवर आला आहे. आता इंग्लंड पहिल्या डावात कशी कामगिरी करतो, हे पाहायचे आहे.