आयसीसी एकदिवसीय विश्वचषक या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये भारतात खेळवला जाणार आहे. 2011 नंतर भारत प्रथमच एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. मात्र, आयसीसीने अद्याप त्याचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. प्रत्येकजण या विश्वचषकाच्या वेळापत्रकाची वाट पाहत आहे, कारण त्यानंतर या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार की नाही हे स्पष्ट होईल आणि जर ते घडले, तर कुठे होईल. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, ICC मंगळवार 27 जून रोजी वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर करू शकते.
ICC ODI World Cup Schedule : आज जाहीर होणार एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक, भारत-पाक सामन्यावर सगळ्यांचे लक्ष
या विश्वचषकाचे यजमान असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वेळापत्रकाचा मसुदा काही दिवस अगोदर आयसीसीकडे पाठवला आहे. या विश्वचषकात सहभागी होणाऱ्या देशांनाही वेळापत्रकाचा मसुदा पाठवला आहे. त्यानुसार ही स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि अंतिम सामना 19 नोव्हेंबरला खेळवला जाईल. त्याला अद्याप आयसीसीची मान्यता मिळालेली नाही. आयसीसी मंगळवारी आवश्यक बदलांसह हे वेळापत्रक जाहीर करू शकते.
बीसीसीआयने आयसीसीकडे पाठवलेल्या वेळापत्रकामुळे पाकिस्तानला काही सामन्यांमध्ये अडचण आली होती. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर घेण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ठेवण्यात आला आहे. मात्र अफगाणिस्तानविरुद्धचा सामना बेंगळुरूमध्ये आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध चेन्नई येथे खेळवला जावा, अशी पाकिस्तानची इच्छा आहे.
त्याचवेळी बीसीसीआयच्या ड्राफ्ट वेळापत्रकात भारत आणि पाकिस्तानचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 15 ऑक्टोबरला होणार होता, पण पाकिस्तानने त्यालाही आक्षेप घेतला होता. हा सामना चेन्नई, कोलकाता किंवा बंगळुरु येथे व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. आता पाकिस्तानच्या मागण्या मान्य होतात की फेटाळल्या जातात, हे पाहावे लागेल.
12 जून रोजी पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने पाठवलेल्या ड्राफ्ट शेड्यूलनुसार, भारत 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळू शकतो. या स्पर्धेतील पहिला सामना सध्याचे विजेते इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात 5 ऑक्टोबर रोजी खेळवण्याचा प्रस्ताव आहे. भारत आपले लीग सामने कोलकाता, मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरूसह नऊ शहरांमध्ये खेळू शकतो.
या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार असून त्यापैकी आठ संघ निश्चित आहेत, तर दोन संघ सध्या खेळल्या जाणाऱ्या क्वालिफायर स्पर्धेद्वारे निश्चित केले जातील, ज्यामध्ये दोन वेळचा विश्वविजेता वेस्ट इंडिज आणि एक वेळचा विश्वविजेता श्रीलंका यांचा समावेश आहे.
विश्वचषकाबाबत, सोमवारी काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले की, या स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल, तर उपांत्य फेरीचे दोन सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियम आणि कोलकाता येथील ईडन गार्डन येथे खेळवले जातील. स्पर्धेला फक्त तीन महिने उरले आहेत. साधारणपणे विश्वचषकाचे वेळापत्रक आतापर्यंत जाहीर केले जाते, परंतु यावेळी वेळापत्रक जाहीर होण्यास विलंब झाला आहे.