WC Qualifire : निकोलस पुरनचे तीन सामन्यांतील दुसरे शतक, त्याने चौकार आणि षटकारांसह केल्या 72 धावा


काही दिवसांपूर्वी आयसीसी विश्वचषक पात्रता फेरीत वेस्ट इंडिजचा झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाला होता. आता त्या पराभवातून बाहेर पडत हा संघ नेदरलँड्सविरुद्ध मैदानात उतरला आहे. या सामन्यात विंडीजचा झंझावाती फलंदाज निकोलस पूरनने शतक झळकावले. त्याच्या शतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने नेदरलँड्सविरुद्ध पूर्ण 50 षटके खेळून सहा गडी गमावून 374 धावा केल्या.

तिसऱ्या सामन्यातील निकोलसचे हे दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने या क्वालिफायरमध्ये नेपाळविरुद्ध शतक झळकावले होते, आता पुन्हा एकदा त्याने आपल्या बॅटने धुमाकूळ घातला आहे. पुरणने नेदरलँडविरुद्ध नाबाद 104 धावांची खेळी केली. आपल्या खेळीत त्याने 65 चेंडूंचा सामना केला आणि नऊ चौकारांव्यतिरिक्त सहा षटकार ठोकले. म्हणजेच त्याने केवळ चौकार आणि षटकारांसह 72 धावा केल्या.

या सामन्यात नेदरलँडने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला फलंदाजीसाठी पाचारण केले. विंडीज संघाला ब्रेंडन किंग आणि जॉन्सन चार्ल्स यांनी दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी केली. चार्ल्स 55 चेंडूत 54 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने नऊ चौकार आणि एक षटकार लगावला. किंगने 81 चेंडूंचा सामना करताना 13 चौकार मारले. 29व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर किंग बाद झाला.त्याआधी शर्मा ब्रुक्स पॅव्हेलियनमध्ये परतला होता.

यानंतर पूरन आणि शाय होप यांनी शतकी भागीदारी केली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी केली. एकूण 271 धावांवर होप पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 38 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 47 धावा केल्या. 41व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर होप पॅव्हेलियनमध्ये परतला. एका धावेनंतर रोमारियो शेफर्ड खाते न उघडताच बाद झाला. जेसन होल्डरला केवळ आठ धावा करता आल्या.

शेवटी किमो पॉलने 25 चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 46 धावा केल्या. त्याने पूरनसोबत शेवटच्या षटकात वेगवान धावा केल्या. दोघांनी सातव्या विकेटसाठी 40 चेंडूत 79 धावांची भागीदारी केली.