Shreyas Iyer Injury : श्रेयस अय्यरच्या इंजेक्शनने वाढल्या टीम इंडियाच्या अडचणी ! आशिया चषकापूर्वी वाईट बातमी


श्रेयस अय्यरच्या इंजेक्शनमुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. आता त्याच्यासाठी आशिया कप 2023 खेळणे अशक्य आहे. खरं तर, या वर्षाच्या सुरुवातीला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याच्या पाठीला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. दुखापतीमुळे अय्यर आयपीएल किंवा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनलही खेळू शकला नाही.

अय्यर बरा होत आहे आणि सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसनावर आहे, परंतु टाईम्स ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, त्याला अजूनही पाठीच्या समस्या आहेत. रिपोर्टनुसार, अय्यरने नुकतेच एनसीएमध्ये पाठदुखीसाठी इंजेक्शन घेतले होते. त्याच्या पाठीत अजूनही दुखत आहे. एप्रिलमध्ये लंडनमध्ये अय्यरच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली होती आणि शस्त्रक्रियेपूर्वी तो भारतीय एकदिवसीय संघाचा महत्त्वाचा भाग होता.

दुखापतीमुळे त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यावरही भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याला फिटनेससाठी 3 महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागेल. म्हणजेच आशिया चषक खेळणेच नाही, तर विश्वचषक खेळणेही त्याला कठीण जाणार आहे. आशिया चषक 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोन्ही देश एकत्र यजमान असतील.

आशिया चषक एकदिवसीय स्वरूपात खेळला जाईल, जो ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या 2023 विश्वचषकापूर्वी एक प्रमुख स्पर्धा असेल. प्रत्येक संघ विश्वचषकाची तयारी म्हणूनही आशिया चषकाकडे पाहत आहे. अशा परिस्थितीत त्याचे विश्वचषक खेळणे धोक्यात आले आहे. अय्यरला येत्या काही महिन्यांत पुनरागमन करणे कठीण जात असताना जसप्रीत बुमराह पुनरागमनाच्या तयारीत आहे. तो आयर्लंडविरुद्ध टीम इंडियात पुनरागमन करू शकतो.