Rinku Singh Debut : 38 दिवसांनी पूर्ण होणार रिंकू सिंगचे स्वप्न, सुरू केली तयारी!


IPL 2023 मध्ये बॅटने धुमाकूळ घालणाऱ्या रिंकू सिंगचे स्वप्न 38 दिवसांनी पूर्ण होऊ शकते. निळी जर्सी घालण्याचे त्याने पाहिलेले स्वप्न वेस्ट इंडिजमध्ये प्रत्यक्षात येऊ शकते. कोलकाता नाईट रायडर्सचा स्फोटक फलंदाज रिंकूने आयपीएलमध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने टीम इंडियाचा दरवाजा ठोठावला. आता येत्या काही दिवसांत त्याच्यासाठी दार उघडणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

भारतीय संघ पुढील महिन्यात 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. कसोटी आणि एकदिवसीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत टी-20 संघ निवडला जाईल. रिपोर्ट्सनुसार, रिंकूची वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवड होऊ शकते. त्याची तयारीही त्याने सुरू केली आहे. तो मैदानावर घाम गाळत आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, रिंकू वेस्ट इंडिज दौऱ्यावर डेब्यू करू शकतो. KKR च्या या स्फोटक फलंदाजाने IPL 2023 च्या केवळ 14 सामन्यांमध्ये आपण काय करू शकतो, हे दाखवून दिले. त्याने 14 सामन्यात 59.25 च्या सरासरीने आणि 149.52 च्या स्ट्राईक रेटने 474 धावा केल्या.

रिंकूने सलग 5 षटकार मारत गुजरातविरुद्ध कहर केला. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 5 टी-20 सामन्यांची मालिका ऑगस्टमध्ये खेळवली जाणार आहे. पहिला सामना 3 ऑगस्टला होणार आहे, म्हणजेच 38 दिवसांनी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो.

वृत्तानुसार, उमेश यादवला वेस्ट इंडिजविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतून वगळण्यात आलेले नाही, तर तो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बाहेर आहे. तो सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. उमेश यादवसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद नाहीत.

सूत्रांचे म्हणणे आहे की, जर अजिंक्य रहाणे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी 15 महिने बाहेर राहिल्यानंतर उपकर्णधार बनू शकतो, तर कोणीही पुनरागमन करू शकतो. कोणत्याही वरिष्ठ खेळाडूसाठी दरवाजे बंद नाहीत. दुसरीकडे, मोहम्मद शमीला टी-20 मालिकेतूनही विश्रांती दिली जाऊ शकते. त्याला कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमधूनही विश्रांती देण्यात आली आहे.