Box Office Collection Day 5 : प्रभास-क्रितीचा ‘आदिपुरुष’ संकटात, पाचव्या दिवशी सर्वात कमी कलेक्शन


प्रभास आणि क्रिती सेनॉनच्या आदिपुरुष चित्रपटामुळे निर्माण झालेल्या गदारोळाचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवरही दिसून येत आहे. चित्रपटात अनेक त्रुटी असून त्यामुळे या चित्रपटाला खूप नकारात्मक प्रसिद्धी मिळाली आहे. आदिपुरुषचे डायलॉग्स आणि खराब VFX वर खूप टीका होत आहे. यासाठी निर्मात्यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे. नकारात्मक पुनरावलोकनांचा परिणाम चित्रपटाच्या पाचव्या दिवसाच्या कमाईवर दिसून आला.

वीकेंडला रेकॉर्ड तोडणारा ओम राऊतचा आदिपुरुष चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर थंडावला आहे. चित्रपटावर होणाऱ्या टीकेचा परिणाम कमाईवर होत आहे. वीकेंडच्या तुलनेत आदिपुरुषाच्या कमाईत मोठी घट झाली आहे. मंगळवारी म्हणजेच रिलीजच्या पाचव्या दिवशी बॉक्स ऑफिस कलेक्शन सर्वात कमी राहिले.

आदिपुरुषने वीकेंडला चांगली कमाई केली होती, पण सोमवारच्या चाचणीतच हा चित्रपट सपशेल अपयशी ठरला. सोमवारी या चित्रपटाने हिंदी भाषेत 20 कोटींचा गल्ला जमवला. रविवारच्या तुलनेत हे प्रमाण 75 टक्क्यांनी घसरले. तर आदिपुरुषने रविवारी 69 कोटी जमा केले होते.

दुसरीकडे, मंगळवारी चित्रपटाच्या कमाईचे प्रारंभिक आकडे त्रासदायक आहेत. सकनिल्‍कच्‍या अहवालानुसार आदिपुरुषने मंगळवारी पाचव्‍या दिवशी केवळ 10.80 कोटी कमावले. अशाप्रकारे चित्रपटाची एकूण कमाई आता 247.90 कोटींवर पोहोचली आहे. तथापि, या अंदाजे आकड्यांमध्ये थोडे बदल होऊ शकतात.

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा चित्रपट 16 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटातील हलक्याफुलक्या आणि मजेदार संवादावर जोरदार टीका होत आहे. त्याचबरोबर हा चित्रपट सुरुवातीपासूनच व्हीएफएक्सच्या संदर्भात समीक्षकांच्या निशाण्यावर होता. काही लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेही या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

आदिपुरुष हा बिग बजेट चित्रपट आहे. रिलीजपूर्वीच या चित्रपटाने जवळपास 400 कोटींची कमाई केली होती. मात्र, आता या चित्रपटावर झालेल्या टीकेनंतर त्याची कमाई अडचणीत आली आहे. चित्रपटाच्या कमाईचा आकडा त्याच दराने घसरला तर नफा काढणे आणि बजेटही काढणे कठीण होईल.