दिलीप वेंगसरकर यांचा बीसीसीआयवर हल्लाबोल, नुसतेच कोट्यावधी कमावले, कुठे आहे पुढचा कर्णधार ?


जेव्हापासून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभूत झाली आहे, तेव्हापासून टीम विरोधातच चर्चा सुरू आहे. काही जण दिग्गज खेळाडूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, तर काही संघ व्यवस्थापनाला गोत्यात आणत आहेत. या पराभवानंतर टीम इंडियामध्ये मोठे बदल होणार असल्याची चर्चा आहे. भविष्यातील संघ बनवण्याबाबत तज्ञ बोलत आहेत. मात्र याचदरम्यान टीम इंडियाचा माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी बीसीसीआयवर निशाणा साधला आहे. दिलीप वेंगसरकर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, बीसीसीआयने फक्त पैसा कमावला आहे, पण ते बेंच स्ट्रेंथ बनवू शकले नाहीत. अद्याप त्यांना भावी कर्णधार सापडला नाही.

हिंदुस्तान टाइम्सशी खास बातचीत करताना दिलीप वेंगसरकर यांनी निवड समिती आणि बीसीसीआयवर निशाणा साधला. ते म्हणाले की, मागील 6-7 वर्षांत निवडकर्त्यांनी भविष्यातील संघ तयार करण्यासाठी काहीही केले नाही. यासोबतच या खेळाडूने बीसीसीआयचाही समाचार घेतला.

बीसीसीआय आणि माजी निवडकर्त्यांविरोधात आघाडी उघडताना वेंगसरकर म्हणाले की, गेल्या 6-7 वर्षांत कोणतेच व्हिजन नव्हते. तसेच निवडकर्त्यांनाही खेळाचे सखोल ज्ञान नव्हते. बडे खेळाडू विश्रांती घेत असताना निवडकर्त्यांनी शिखर धवनला कर्णधार बनवले. भावी कर्णधार तिथे काम करू शकतो.

वेंगसरकर बीसीसीआयविरोधात म्हणाले की, संघ व्यवस्थापनानेही कोणालाही तयार केले नाही. तुम्ही सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाबद्दल बोलत आहात. पण बेंच स्ट्रेंथ कुठे आहे? केवळ आयपीएलचे आयोजन करून मीडियाच्या अधिकारातून करोडो रुपये मिळवणे ही एकमेव उपलब्धी नसावी.

दिलीप वेंगसरकर यांचा प्रश्न योग्य आहे. रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा कर्णधार कोण असेल, याचे उत्तर अद्याप सापडलेले नाही. हार्दिक पांड्या टी-20 आणि वनडेमध्ये त्याची जागा घेऊ शकतो, पण कसोटीत ही जबाबदारी कोणाकडे सोपवली जाणार? या प्रश्नाचे उत्तर वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर मिळेल, पण विश्वास ठेवा, टीम इंडियाकडे फार कमी पर्याय आहेत.