चेतेश्वर पुजारा आऊट, यशस्वी जैस्वालची एन्ट्री! वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात मोठा बदल


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला. यासह भारताचे सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंगले. आता टीम इंडिया पुढील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील मोहिमेची सुरुवात वेस्ट इंडिज दौऱ्यापासून करेल. सध्या भारतीय संघ एक महिन्याच्या विश्रांतीवर आहे.

यानंतर संघ वेस्ट इंडिजच्या दीर्घ दौऱ्यावर व्यस्त असेल. पुढील महिन्यात भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामने खेळवले जातील. भारत या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने करणार आहे. या मालिकेत संघात काही मोठे बदलही पाहायला मिळू शकतात.

क्रिकबझच्या बातमीनुसार, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची बॅकअप प्लेअर, यशस्वी जैस्वाल चेतेश्वर पुजाराची जागा घेऊ शकतो. पुजारा हा भारतीय कसोटी संघातील 3 क्रमांकाचा महत्त्वाचा फलंदाज आहे, परंतु तो गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत आहे. 2020 पासून आतापर्यंत 52 डावांमध्ये त्याच्या बॅटमधून फक्त एकच शतक झळकले आहे. त्याची सरासरी 29.69 होती.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही त्याची बॅट चालली नाही. खराब शॉट खेळून तो बाद झाला. त्याच्या शॉट सिलेक्शनवर यापूर्वीही अनेकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशा स्थितीत वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणे त्याच्यासाठी कठीण आहे. त्याची संघात निवड झाली, तरी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

पुजारा बाहेर गेला, तर जैस्वाल तिसऱ्या क्रमांकावर त्याची जागा घेऊ शकतो. जैस्वालबद्दल बोलायचे झाले, तर तो अप्रतिम फॉर्ममध्ये धावतोय. आयपीएलमध्ये त्याच्या बॅटने आग ओकली होती. जैस्वालने 14 सामन्यात 48.08 च्या सरासरीने 625 धावा केल्या होत्या ज्यात 1 शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत शेवटच्या क्षणी त्याची बॅकअप खेळाडू म्हणून निवड झाली. लग्नामुळे भारतीय संघातून वगळलेल्या ऋतुराज गायकवाडची जागा त्याने घेतली.