AFG vs BAN : पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर विकेट, मग बांगलादेशला मारला ‘पंजा’, अफगाणिस्तानच्या गोलंदाजाने केला चमत्कार


अफगाणिस्तान क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले पाय रोवत आहे. पण या संघाची एक खासियत म्हणजे या संघाची गोलंदाजी उत्कृष्ट आहे. राशिद खान, नवीन उल हक, नूर अहमद, मुजीब उर रहमान यांनी आपली क्षमता दाखवली असून आता या संघातून आणखी एक स्टार उदयास येत आहे. या खेळाडूचे नाव आहे निजात मसूद. या खेळाडूने पदार्पणाच्या सामन्यात चमकदार कामगिरी करत बांगलादेशच्या फलंदाजांना अडचणीत आणले.

अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमानांचा संघ पहिल्या डावात 382 धावांत आटोपला. बांगलादेशने पहिल्या दिवसअखेर 5 विकेट गमावत 362 धावा केल्या. दुसऱ्या दिवशी हा संघ आपल्या खात्यात केवळ 20 धावा जमा करू शकला आणि 382 धावांवर गारद झाला. या सामन्याच्या पहिल्या डावात निजातने पाच विकेट्स घेतल्या.

या सामन्यात अफगाणिस्तानने निजातला पदार्पणाची संधी दिली. या गोलंदाजाने कसोटी कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. सामन्याच्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने झाकीर हसनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर निजातने मोमिनुल हकला आपला दुसरा बळी बनवला. मोमिनुलने 25 चेंडूत 15 धावा केल्या. पहिल्या दिवशी दोन विकेट्स घेतल्यानंतर निजातने दुसऱ्या दिवशीही धुमाकूळ घातला.

बांगलादेशचा अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीमलाही निजातने आपला बळी बनवले.दुसऱ्या दिवशी त्याच्यावर बरेच काही अवलंबून होते, पण निजातने त्याला आपला बळी बनवले. त्याला अर्धशतकही करता आले नाही आणि तो 47 धावांवर बाद झाला. यानंतर तैजुल इस्लामही निजातचा बळी ठरला. निजातनेही शरीफुल इस्लामला बाद करून बांगलादेशचा डाव संपुष्टात आणला. त्याला केवळ सहा धावा करता आल्या. पदार्पणाच्या कसोटी सामन्यात पाच विकेट घेणारा तो अफगाणिस्तानचा दुसरा गोलंदाज ठरला आहे.

गोलंदाजांनी आपले काम केले होते, पण अफगाणिस्तानच्या फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या 146 धावांत गारद झाला. त्यांचे फक्त चार फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. अफसर जझाईने संघाकडून सर्वाधिक 36 धावा केल्या. नासिर जमालने 35 धावांची खेळी केली. करीम जनातने 23 धावांचे योगदान दिले. अब्दुल मलिक 17 धावांच्या पुढे जाऊ शकला नाही.

बांगलादेशकडून इबादत हुसेनने चार विकेट घेतल्या. इस्लाम, तैजुल, मेहेदी हसन मिराज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.