ICC Test Rankings : मार्नस लबुशेन, स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांनी मोडला 39 वर्षांचा विक्रम


जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाने आयसीसी कसोटी क्रमवारीतही झेंडा रोवला आहे. ताज्या ICC कसोटी क्रमवारीत, तीन ऑस्ट्रेलियन फलंदाज अव्वल 3 मध्ये आहेत, जे 39 वर्षांमध्ये प्रथमच घडले आहे.

मार्नस लॅबुशेन हा ICC कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे. स्टीव्ह स्मिथने एका स्थानाने झेप घेत दुसरे स्थान पटकावले आहे.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा सामनावीर ठरलेला ट्रॅव्हिस हेड पाचव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

39 वर्षांपूर्वी 1984 मध्ये, शेवटच्या वेळी असे घडले होते की एकाच संघाचे तीन फलंदाज कसोटी क्रमवारीत पहिल्या 3 मध्ये होते. हा पराक्रम वेस्ट इंडिजच्या गॉर्डन ग्रिनीज, क्लाइव्ह लॉईड आणि लॅरी गोम्स यांनी केला होता.

ऑस्ट्रेलियाचा आणखी एक फलंदाज कसोटी क्रमवारीत पहिल्या दहामध्ये आहे. उस्मान ख्वाजा 9व्या स्थानावर आहे. त्याचबरोबर भारताकडून ऋषभ पंत 10व्या स्थानावर आहे. रोहित शर्मा 12व्या तर विराट कोहली 13व्या क्रमांकावर आहे.