भेटा UClean कंपनीचा मालक अरुणाभ सिन्हा याला, IIT चा विद्यार्थी ज्याने उभा केला 100 कोटींचा व्यवसाय


असे म्हणतात की जीवनातील विजेते काही वेगळे करत नाहीत, तर ते प्रत्येक गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात. जमशेदपूरच्या अरुणाभ सिन्हा याच्यावर ही ओळ अगदी चपखल बसते. आयआयटी बॉम्बेच्या या विद्यार्थ्याने आज 100 कोटींचा व्यवसाय उभा केला आहे. देशातील सर्वात यशस्वी उद्योजकांमध्ये त्याची गणना होते. अरुणाभ सिन्हा याने लॉन्ड्री सेवेने याची सुरुवात केली. भारतातील बहुतेक लाँड्री सेवेमध्ये वॉशरमन असतात. ते तुमच्या घरून कपडे घेतात, धुतात आणि इस्त्री करुन परत करतात. यातून जे मिळेल त्यावर ते आपले जीवन चालवतात. पण, अरुणाभने लाँड्री सेवेतूनच एवढा मोठा व्यवसाय उभा केला, की आज तो देशातील सर्वात मोठी साखळी UClean चा मालक आहे. त्याची लॉन्ड्री साखळी 100 शहरांमध्ये पसरलेली आहे. आज आम्ही तुम्हाला त्याची यशोगाथा सांगणार आहोत.

अरुणाभ सिन्हा याचा जन्म जमशेदपूर येथे झाला. मध्यमवर्गात जन्मलेल्या अरुणाभचे वडील पेशाने शिक्षक होते. ते लोकांना शिकवणी द्यायचे. आई घरकाम सांभाळायची. अरुणाभ अभ्यासात खूप हुशार होता. यामुळे त्याने आयआयटी बॉम्बेमधून मेटलर्जी आणि मटेरियल सायन्समध्ये मास्टर्स केले. ग्रॅज्युएशननंतर, अरुणाभ पुण्यातील यूएस स्थित कंपनीत विश्लेषणात्मक सहयोगी म्हणून रुजू झाला. पण, 100 कोटींचा बिझनेस उभारणाऱ्या अरुणाभने काही वेगळेच करण्याचे ठरवले होते.

2011 मध्ये, अरुणाभने FranGlobal नावाची व्यवसाय सल्लागार कंपनी स्थापन केली. ही कंपनी सुरू करण्यामागचा उद्देश विदेशी कंपन्यांना मदत करणे हा होता. 2015 मध्ये अरुणाभने आपला व्यवसाय एका फ्रँचायझीला विकला. यानंतर सिन्हा याला ट्रीबो हॉटेल्सने उत्तर भारताचे संचालक बनवले. तिथे काम करत असताना अरुणाभला काहीतरी लक्षात आले की जे पाहुणे हॉटेलमध्ये राहायचे ते घाणेरडे कपडे, पलंगावरील डाग आणि लॉन्ड्रीशी संबंधित अनेक समस्यांबद्दल खूप तक्रार करायचे. येथूनच अरुणाभने लॉन्ड्री सेवेचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याने एका मुलाखतीत सांगितले की, मी येथे संधी पाहिली आणि नोकरी सोडली.

अरुणाभने 2016 मध्ये दिल्ली-NCR मधून UClean ही लॉन्ड्री सेवा कंपनी सुरू केली. यासाठी अरुणाभ याने मार्केटचे विश्लेषण करून संशोधन केले. व्यवसाय सुरू करताना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते, ते कसे सुरू करायचे, यावर काम सुरू झाले. राजधानी दिल्लीपासून सुरू झालेला हा व्यवसाय हळूहळू पुणे-हैदराबाद मार्गे 350 दुकानांसह 100 हून अधिक शहरांमध्ये पसरला आहे. UClean ने फक्त भारतच नाही तर बांगलादेश आणि नेपाळ या शेजारी देशांपर्यंत पोहोचले आहे. आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील शहरांमध्येही ते उघडण्याची अपेक्षा आहे.

आता आम्ही तुम्हाला अरुणाभच्या UClean कंपनीबद्दल सांगतो. या कंपनीबद्दल बोलायचे झाले तर ती कपड्यांचे वजन किलोने करते. यामध्ये कंपनीचा एक माणूस तुमच्या घरी येईल, तुमच्या कपड्यांचे डिजिटल स्केलवर वजन करेल आणि प्रति किलो दर आकारेल. कंपनी 24 तासांच्या आत ग्राहकांना कपडे देखील परत देते. कंपनीत काम करणारे कर्मचारी कपडे धुण्यासाठी कमीत कमी पाण्याचा वापर करतात. यासाठी ते एन्झाइम आधारित डिटर्जंट वापरतात. तसेच पर्यावरणाची हानी होत नाही. देशाच्या प्लॅस्टिकमुक्ती मोहिमेअंतर्गत, कपडे इस्त्री केले जातात आणि धातूच्या टोपल्यांमध्ये पॅक करून लोकांपर्यंत पोचवले जातात.