LPL 2023 : लंका प्रीमियर लीगमध्ये लागणार सुरेश रैनावर बोली, स्पर्धेत तो बाबर आझमसोबत खेळणार की विरोधात?


लंका प्रीमियर लीग 2023 च्या लिलावात, जेव्हा मिस्टर आयपीएल सुरेश रैनाला विकत घेण्यासाठी फ्रेंचायजींमध्ये स्पर्धा होईल, तेव्हा वातावरण आणखीन तापणार आहे. होय, सुरेश रैनाने एलपीएल 2023 च्या लिलाव यादीत आपले नाव नोंदवले आहे. लंका प्रीमियर लीगसाठी संघांनी यापूर्वीच अनेक खेळाडूंना करारबद्ध केले आहे. म्हणजे ते लिलावात सहभागी होणार नाहीत. त्यापैकी एक पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आहे. आता सुरेश रैना बाबर आझमसोबत खेळणार की विरुद्ध, हे लिलावानंतरच कळेल.

लंका प्रीमियर लीगचा लिलाव 14 जून रोजी होणार आहे, तर ही स्पर्धा 31 जुलैपासून सुरू होणार आहे, ज्यामध्ये एकूण 5 संघ भाग घेतील. श्रीलंका क्रिकेटने सोमवारी लिलावात सहभागी होणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या नावांची यादी जाहीर केली.

सुरेश रैनाची आयपीएल कारकीर्द चांगली आहे, जिथे त्याने गुजरात जायंट्स आणि विशेषत: चेन्नई सुपर किंग्जसाठी केवळ खूप धावा केल्या नाहीत, तर अनेक विक्रमही केले. रैनाची गणना आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाजांमध्ये केली जाते आणि त्याचे आकडेही याची साक्ष देतात.

डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने आयपीएलच्या 205 सामन्यांमध्ये 5500 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एक शतक नोंदवले आहे. सध्या तो लंका प्रीमियर लीगमध्ये ही कामगिरी कायम ठेवू इच्छितो. BCCI च्या नियमांनुसार, जेव्हा एखादा खेळाडू सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करतो, तेव्हा तो दुसऱ्या देशाच्या लीगमध्ये खेळू शकतो. त्याच धर्तीवर रैना लंका प्रीमियर लीगकडेही वळला आहे.

लंका प्रीमियर लीगमध्ये रैनाला प्रत्येक देशातील खेळाडूंसह पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा सामना करावा लागणार आहे. एलपीएल 2023 मध्ये बाबर आझम हा पाकिस्तान क्रिकेटचा सर्वात मोठा चेहरा असेल, ज्याला कोलंबो स्ट्रायकर्स संघाने आधीच स्थान दिले आहे. आता रैनाला कोलंबो स्ट्रायकर्सने विकत घेतल्यास तो बाबर आझमसोबत खेळू शकतो. तसे न झाल्यास त्यांच्या विरोधात खेळावे लागेल.