WTC Final: ‘कोहली हैं तो मुमकिन है’ जस्टिन लँगरने दिला ऑस्ट्रेलियाला इशारा


लंडनमधील ओव्हल येथे खेळल्या जात असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियन संघ विजयाच्या जवळ दिसत आहे. सामना ज्या स्थितीत आहे, ते पाहता ऑस्ट्रेलिया सहज जिंकेल, असे दिसते. सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताला 280 धावांची गरज असताना, त्यांच्या फक्त सात विकेट शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा पराभव निश्चित असल्याचे सगळ्यांनाच वाटत आहे. पण ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक हे मान्य करत नाहीत. जस्टिन लँगर म्हणतो की, विराट कोहली जोपर्यंत मैदानात आहे, तोपर्यंत ऑस्ट्रेलियाला स्वप्न पाहण्याची गरज नाही.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या होत्या. भारतीय संघाला पहिल्या डावात केवळ 296 धावा करता आल्या. यानंतर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव 8 विकेट गमावत 270 धावांवर घोषित केला आणि भारताला 444 धावांचे लक्ष्य दिले. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने दुसऱ्या डावात तीन गडी गमावून 164 धावा केल्या आहेत.

चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत विराट कोहली 44 धावा करून नाबाद परतला, तर अजिंक्य रहाणे 20 धावा करून नाबाद राहिला. जोपर्यंत कोहली मैदानावर आहे, तोपर्यंत टीम इंडियाचा विजय शक्य आहे, असे ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक लँगर यांना वाटते. जोपर्यंत कोहली क्रीजवर आहे, तोपर्यंत टीम इंडियाच्या विजयाच्या आशा कायम राहतील, असे लँगरने सांगितले. लँगरच्या मते, कोहली एक महान खेळाडू आहे आणि असे खेळाडू चमत्कार घडवतात.

लँगरच्या मते, विराट कोहलीची विकेट मिळेपर्यंत ऑस्ट्रेलियाने विश्रांती घेऊ नये. कोहलीची गणना जगातील महान फलंदाजांमध्ये केली जाते. या खेळाडूचे बलस्थान म्हणजे त्याची धडपड, आक्रमकता, ज्याची टीम इंडियाला यावेळी गरज आहे. कोहली टिकला तर भारताच्या विजयाची शक्यता खूप जास्त आहे.

जर टीम इंडियाने हा सामना जिंकला, तर त्याचे नाव इतिहासात नोंदवले जाईल. एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये झालेला नाही. आतापर्यंत 400 हून अधिक धावांचे लक्ष्य केवळ चार वेळा कसोटीत पार केले गेले आहे. जर टीम इंडियाने हे लक्ष्य गाठले तर ती इतिहास रचेल.