Asia Cup : 8 वर्षांनंतर भारत-पाकिस्तान सामना, टीम इंडियाने 19 मिनिटांत खेळ संपवत पटकावले विजेतेपद


भारताच्या ज्युनियर संघाने पाकिस्तानला धडा शिकवला. पाकिस्तानचा 2-1 असा पराभव करत भारताने चौथ्यांदा ज्युनियर आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले. तब्बल 8 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ही स्पर्धा झाली. म्हणजेच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत तब्बल 8 वर्षांनंतर भारत-पाकिस्तान संघ भिडले होते. या सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. मैदानही भरले होते.

हाय व्होल्टेज सामना अपेक्षित होता, पण जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने आले, तेव्हा 19 मिनिटांत भारताने पाकिस्तानचा खेळ संपवला. पहिल्या 19 मिनिटांतच भारताने पाकिस्तानला सांगितले की, भारताच्या माजी प्रशिक्षकाचा पाठिंबा असूनही त्यांना पराभूत करणे कठीण आहे.

भारताकडून अंगद बीर सिंगने 12व्या मिनिटाला आणि अरिजित सिंगने 19व्या मिनिटाला गोल केले. भारताचे माजी प्रशिक्षक रोएलंट ओल्टमन्स यांनी प्रशिक्षित केलेल्या पाकिस्तानी संघासाठी बशारत अलीने 37 व्या मिनिटाला एकमेव गोल केला. यापूर्वी भारताने 2004, 2005 आणि 2015 मध्ये विजेतेपद पटकावले होते, तर पाकिस्तानने 1987, 1992 आणि 1996 मध्ये विजेतेपद पटकावले होते.

इतकंच नाही तर याआधी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ 3 वेळा भिडले होते. 1996 मध्ये पाकिस्तान आणि 2004 मध्ये भारत जिंकला होता. शेवटच्या वेळी म्हणजे 2015 मध्ये भारताने अंतिम फेरीत 6-2 ने पराभूत करून विजेतेपद पटकावले होते.

पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने पाकिस्तानवर दबाव आणला होता. हाफ टाईमपर्यंत भारताने 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली होती. हाफ टाईमपूर्वी पाकिस्तानला खाते उघडण्याची संधी होती, पण भारताचा गोलरक्षक मोहित एच.एस. शाहिद अब्दुलच्या प्रयत्नावर त्यांनी पाणी फेरले. तिसऱ्या क्वार्टरच्या 7व्या मिनिटाला पाकिस्तानने आपले खाते उघडले.

भारताने पाकिस्तानचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडला. 50 व्या मिनिटाला पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण संधीचे सोने करता आले नाही. 4 मिनिटांनंतर, त्याला आणखी 2 पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु भारताने त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी केले.

यापूर्वी, हॉकी ज्युनियर आशिया चषक 2023 च्या साखळी टप्प्यातही दोन्ही संघ भिडले होते, जिथे सामना 1-1 असा बरोबरीत संपला होता. साखळी टप्प्यात दोन्ही संघांनी एकही सामना गमावला नव्हता. उत्कृष्ट गोल सरासरीच्या जोरावर भारतीय संघ साखळी फेरीत अव्वल ठरला.