IPL 2023 : रोहित शर्मासमोर सर्वात मोठे आव्हान, गुजरातच्या या धोक्याला सामोरे गेल्यावरच जिंकू शकेल मुंबई


काही जुने दिग्गज आणि काही नवीन तरुण चेहऱ्यांच्या कामगिरीमुळे आयपीएलचा हा मोसम चर्चेत राहिला आहे. या मोसमात एमएस धोनी, विराट कोहली, फाफ डुप्लेसी, रशीद खान या अनुभवी दिग्गजांनी वर्चस्व गाजवले, तर यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सुयश शर्मा आणि आकाश मधवाल यासारख्या नवीन नावांनीही छाप पाडण्यात यश मिळविले. या सगळ्यात, असा अनुभवी खेळाडू सतत आगपाखड करत आहे, जो दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मुंबई इंडियन्ससाठी सर्वात मोठे आव्हान उभे करेल.

दुसरा क्वालिफायर सामना शुक्रवार, 26 मे रोजी म्हणजे आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल, ज्यामध्ये पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्सशी होईल. साखळी फेरीत पहिले स्थान पटकावणाऱ्या हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरातला पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला. आता अंतिम फेरी गाठण्यासाठी त्यांना मुंबईवर मात करावी लागणार आहे.

गेल्या काही सामन्यांमध्ये मुंबईने ज्या प्रकारे आपली लय साधली आहे, ते पाहता गुजरातचा रस्ता सोपा जाणार नाही. एक खेळाडू त्यांच्यासाठी हे काम नक्कीच करू शकतो आणि तो म्हणजे अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी. या संपूर्ण हंगामात स्टार भारतीय वेगवान गोलंदाजाने सातत्याने आपले काम चोख बजावले आहे.

शमी हा या मोसमातील सर्वात यशस्वी गोलंदाज असून त्याने आतापर्यंत 15 सामन्यांत सर्वाधिक 26 विकेट्स घेतल्या आहेत. पॉवरप्लेची मारक गोलंदाजी हे त्याच्या यशात मोठे योगदान आहे. या 26 पैकी शमीने पॉवरप्लेमध्ये 15 विकेट घेतल्या आहेत, जे इतर सर्व गोलंदाजांपेक्षा जास्त आहे.

गेल्या मोसमातही शमीने पॉवरप्लेमधील अचूक लाईनच्या जोरावर गुजरातला चॅम्पियन बनवण्यात मोलाचा वाटा उचलला होता. चालू मोसमात तो या आघाडीवर अधिक मारक ठरला आहे. गुजरातच्या चेन्नईविरुद्धच्या पराभवाचे प्रमुख कारण म्हणजे पॉवरप्लेमध्ये शमीला विकेट न मिळणे. अशा स्थितीत शमी पहिल्या 6 षटकांत विकेट घेणार नाही, अशी आशा आणि प्रयत्न मुंबईला करावे लागतील.

या मोसमात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म पाहता शमीचा धोका खूप जास्त आहे. या हंगामात रोहित पॉवरप्लेमध्ये 10 पेक्षा जास्त वेळा बाद झाला आहे. एवढेच नाही तर रोहित शर्मा आयपीएलमध्ये दोनदा शमीचा बळी ठरला आहे. अशा स्थितीत मुंबईला सुरुवातीला दडपणाखाली ठेवण्याची चांगली संधी गुजरात आणि शमीकडे असेल.