ICC WTC Final : फायनलमध्ये वापरण्यात येणार चेंडू ऑस्ट्रेलियासाठी ठरणार काळ, कांगारूंची झोप उडवणारी बातमी


आयपीएल-2023 शेवटच्या टप्प्यात आहे. या लीगचा प्लेऑफ टप्पा मंगळवारपासून सुरू होत आहे. त्यानंतर 7 जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलकडे सर्वांचे लक्ष असेल. ओव्हल मैदानावर हा सामना खेळवला जाईल. या सामन्यापूर्वी असे काही घडले आहे, जे ऑस्ट्रेलियासाठी अडचणीचे ठरू शकते. या सामन्यात वापरण्यात येणारा चेंडू ऑस्ट्रेलियासाठी अडचणीचा ठरू शकतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ड्यूक बॉलचा वापर WTC फायनलमध्ये होणार आहे. हा चेंडू इंग्लंडमध्ये वापरला जातो. अशा स्थितीत अंतिम फेरीतही हाच चेंडू वापरला जाईल. याआधी ऑस्ट्रेलियात वापरण्यात येणारा कुकाबुरा चेंडू वापरला जाऊ शकतो, असे बोलले जात होते. पण आता ड्यूक बॉलचा वापर होणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

इनसाइड स्पोर्ट्सने आपल्या अहवालात बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने लिहिले आहे की, हा सामना फक्त ड्यूक बॉलने खेळवला जाईल. अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय गोलंदाजांना आयपीएलमध्ये ड्युक्स बॉल देण्यात आला, जेणेकरून ते अंतिम सामन्याची तयारी करू शकतील. अशा परिस्थितीत भारतीय गोलंदाजांना या चेंडूने खेळण्याचा सराव आहे, तर ऑस्ट्रेलियात नाही. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघासाठी ही गोष्ट धोकादायक ठरू शकते.

भारताने WTC फायनलसाठी संघ जाहीर केला आहे. आयपीएलचा लीग टप्पा संपल्यानंतर, टीम इंडियामध्ये निवडलेले काही खेळाडू आता मोकळे आहेत, कारण त्यांचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. त्यामुळे फ्री झालेले खेळाडू टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफसह इंग्लंडला रवाना होतील. स्पोर्ट स्टारच्या रिपोर्टनुसार, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट हे मंगळवारी इंग्लंडला रवाना होतील.

कर्णधार रोहित शर्मा आणि बाकीचे खेळाडू 29 मे नंतर इंग्लंडला रवाना होतील. चेतेश्वर पुजारा अजूनही इंग्लंडमध्ये असून तेथे काऊंटी क्रिकेट खेळत आहे. या आठवड्याच्या अखेरीस प्रथम इंग्लंडला जाणाऱ्या खेळाडूंमध्ये पुजारा सामील होणार आहे.