ज्येष्ठ क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने गुरुवारी इंटरनेटवर सुरू असलेल्या बनावट जाहिरातींमध्ये त्याचे नाव, फोटो आणि आवाज वापरल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे गुन्हा दाखल केला आहे. आपले नाव, प्रतिमा आणि आवाज वापरून लोकांची फसवणूक होत असल्याचा आरोप त्याने तक्रारीत केला आहे. एवढेच नाही तर या बनावट जाहिरातींमध्ये दावा केला जात आहे की, सचिन तेंडुलकरचे प्रोडक्ट विकत घेतल्यावर तुम्हाला सचिनचा स्वाक्षरी असलेला टी-शर्ट मिळेल. सचिन तेंडुलकरच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सचिन तेंडुलकरने सायबर सेलमध्ये दाखल केला फसवणुकीचा गुन्हा, हे केले आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, सचिनच्या स्वीय सहाय्यकाने गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, 5 मे रोजी फेसबुकवर एका तेल कंपनीची जाहिरात पाहिली, ज्यामध्ये तेल कंपनीने तेंडुलकरचा फोटो वापरला होता आणि त्या उत्पादनाची शिफारस स्वतः सचिन तेंडुलकरने केली होती, असे लिहिले होते. तेंडुलकरच्या पर्सनल असिस्टंटच्या तक्रारीनुसार, इन्स्टाग्रामवरही अशाच प्रकारच्या जाहिराती पाहण्यात आल्या आहेत.
मुंबई क्राइम ब्रँचला मिळालेल्या तक्रारीच्या आधारे सचिन तेंडुलकर अशा कोणत्याही उत्पादनाला मान्यता देत नाही. या जाहिरातीत सचिन तेंडुलकरच्या आवाजाचा गैरवापर करण्यात आला आहे, तसेच त्याच्या छायाचित्रांचाही गैरवापर केला जात आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर, गुन्हे शाखेने या प्रकरणी आयपीसीच्या विविध कलम 420, 465 आणि 500 नुसार फसवणूक आणि बनावटगिरी आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.