समीर वानखेडेने शाहरुखचा मुलगा आर्यन खान याला कसे अडकवले?


2 ऑक्टोबर 2021. या तारखेला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मुंबईच्या कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला. एनसीबीच्या अधिकाऱ्यांना क्रूझवर रेव्ह पार्टीची माहिती मिळाली होती. NCB ने बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेत्याचा मुलगा आर्यन खान याच्यासह एकूण 19 जणांना अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाची बरीच चर्चा झाली होती. या प्रकरणामुळे एक अधिकारी चांगलाच चर्चेत आला होता. नाव होते समीर वानखेडे.

मात्र, त्यानंतर समीर वानखेडे याने कायद्याच्या नियमांना बगल देत आर्यन खानला आरोपी बनवल्याचा आरोप झाला होता. आता सीबीआयने समीर वानखेडेवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांना धाडीच्या बहाण्याने पैसे उकळायचे होते, अशी चर्चा होती. यासाठी त्याने अशा व्यक्तीला मोहरा बनवले, जो त्याला सहज पैसे पाठवू शकेल. तो होता शाहरुखचा मुलगा आर्यन खान.

ड्रग्ज प्रकरणात अडकवून करायची होती करोडोंची वसूली
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांना 25 कोटींची वसूली करायची होती, असे खुद्द सीबीआयने नमूद केले आहे. कदाचित याच कारणामुळे आर्यन खान त्यांच्या निशाण्यावर आला होता. त्याच्याकडून अॅडव्हान्स म्हणून 50 लाख रुपयांची लाचही घेतल्याचे सीबीआयने सांगितले आहे. आरोपी अधिकाऱ्यांमध्ये समीर वानखेडेचेही नाव आहे. वानखेडे यांच्यावर लाच घेण्यासाठी अन्य अधिकाऱ्यांची मदत घेतल्याचा आरोप आहे.

आरोप मान्य करण्यासाठी आर्यनवर टाकण्यात आला दबाव
एनसीबीचे अधिकारी आर्यन खानवर आरोप मान्य करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा दावा करण्यात आला. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आर्यनवर आपला रोष दाखवला. पण, आर्यनने आरोप फेटाळले. यादरम्यान शाहरुख खान आपल्या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला.

तत्कालीन डीडीजींच्या नाकाखाली रचले गेले वसुलीचे षडयंत्र
या प्रकरणी सीबीआय वाराणसीचे पोलीस आयुक्त अशोक मुथा जैन यांचीही चौकशी करू शकते. अशोक मुथा जैन हे तत्कालीन एनसीबीचे डीडीजी होते. सीबीआयच्या सूत्रांवर विश्वास ठेवला तर, 25 कोटी रुपये वसूल करण्याचा कट डीडीजी अशोक मुथा जैन यांच्या नाकाखाली रचला गेला होता. अशोक मुथा जैन यांना आरोपी अधिकारी समीर वानखेडे यांच्या या कृत्यांची माहिती कशी नव्हती, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. मात्र, मुथा जैन यांच्यावर थेट कोणताही आरोप नाही.

त्यानंतर समीर वानखेडेवर नवाब मलिक यांनी केले होते आरोप
महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आर्यनच्या बहाण्याने शाहरुखला धमकावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते. प्रतिक गाबा आणि आमिर फर्निचरवाला यांनी आर्यनला जहाजावर पार्टीसाठी नेल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. मात्र, तिघांनाही एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सोडून दिले.

मंत्र्यांच्या मुलांना पार्टीत बोलावण्याचा झाला प्रयत्न
क्रूझ पार्टीचे आयोजक काशिफ खान असल्याचा दावाही नवाब मलिक यांनी केला होता. या व्यक्तीने राज्यमंत्री अस्लम शेख आणि इतर अनेक मंत्र्यांच्या मुलांना पार्टीत बोलावण्याचा प्रयत्न केला. हे संपूर्ण प्रकरण खोटे असल्याचेही मलिक म्हणाले होते. त्यांचा त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा उद्देश होता.