IPL 2023 : युझवेंद्र चहल बनला गोलंदाजीचा नवा बॉस, सर्वात कमी सामने खेळून रचला विक्रम


अवघ्या 10 वर्षात युझवेंद्र चहल आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाज बनला आहे. भारताचा अनुभवी लेगस्पिनर युझवेंद्र चहलने ड्वेन ब्राव्होचा आयपीएलमध्ये सर्वाधिक बळींचा विक्रम मोडून इतिहास रचला आहे.

राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या चहलने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात नितीश राणाची विकेट घेताच आपल्या नावावर आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम केला. चहलने कोलकाताविरुद्ध 4 विकेट घेतल्या होत्या.

नितीश राणाची विकेट ही त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 184 वी विकेट ठरली. यासह त्याने चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी गोलंदाज ड्वेन ब्राव्होला मागे टाकले. विशेष म्हणजे चहलने अवघ्या 143 सामन्यांमध्ये हा पराक्रम केला, तर ब्राव्होने 161 सामन्यात ही कामगिरी केली. एवढेच नाही तर सर्वाधिक बळी घेणाऱ्या पाच गोलंदाजांमध्ये चहलने सर्वात कमी सामने खेळले आहेत.

चहलने 2013 मध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो मुंबई इंडियन्सचा भाग होता, पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. 2014 मध्ये त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विकत घेतले आणि त्याला येथे सर्वाधिक यश मिळाले. 2022 मध्ये त्याला राजस्थानने विकत घेतले.

चहलने बंगळुरूकडून 124 सामन्यात 139 विकेट घेतल्या. बंगळुरूसाठी 100 बळी घेणारा तो पहिला गोलंदाज होता. त्याचबरोबर चहलने राजस्थानकडून 29 सामन्यात 48 विकेट घेतल्या आहेत. त्याने गेल्या मोसमात 27 विकेट घेत पर्पल कॅपही जिंकली होती.