World Cup 2023 : पाकिस्तानचे आयसीसीवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरूच, समोर आली पडद्यामागील विश्वचषकाची कहाणी


आशिया कपसाठी पाकिस्तानात जाण्यापूर्वीच भारताने स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने 2023 च्या विश्वचषकासाठी भारतात जाणार नाही, अशी धमकीही दिली होती. आशिया कप 2023 चे यजमानपद पाकिस्तानच्या हातातून जवळपास निसटले आहे. असे असूनही ते सतत आयसीसीवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे.

अशा बातम्या येत आहेत की विश्वचषक स्पर्धेतील सहभागाबाबत त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आम्ही आयसीसीला लेखी आश्वासन देऊ शकत नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशिया चषकाचे यजमानपद संपल्यानंतर पाकिस्तान भारतात होणाऱ्या विश्वचषकात सहभागी होईल की नाही याबाबत आयसीसीला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून कोणतेही लेखी आश्वासन मिळालेले नाही.

भारत पाकिस्तानात येतो की पाकिस्तान भारतात जातो, हे बीसीसीआय किंवा पीसीबीवर अवलंबून नाही, असे पाकिस्तान बोर्डाचे म्हणणे आहे. त्यामुळे पीसीबी वर्ल्ड कपमधील सहभागाबाबत आयसीसीला कोणतेही आश्वासन देऊ शकत नाही. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, आयसीसी बोर्डाच्या सदस्याने सांगितले की, बीसीसीआयप्रमाणेच पाकिस्तानलाही त्यांचे सरकार मान्यता देईल.

यापूर्वी अशा बातम्याही आल्या होत्या की, पाकिस्तानने वर्ल्ड कपमध्ये भाग घेतल्यास अहमदाबादमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होऊ शकतो. आशिया चषकाबाबत बोलायचे झाले तर त्याचे यजमानपद पाकिस्तानच्या हाताबाहेर गेले आहे.

आशियाई क्रिकेट परिषद ही स्पर्धा श्रीलंकेत आयोजित करण्याची योजना आखत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांचे हायब्रीड मॉडेल अनेक देशांनी नाकारले होते. या प्रस्तावानुसार पाकिस्तान आपले सर्व सामने मायदेशात खेळेल, तर भारत आपले सामने यूएईमध्ये खेळेल, परंतु त्यांची योजना फेटाळण्यात आली.