जेनिफर मिस्त्रीच्या लैंगिक शोषणच्या आरोपावर असित मोदी म्हणाले, तिने सेटवर केले गैरवर्तन, करणार कायदेशीर कारवाई’


सोनी सब टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका तारक मेहता का उल्टा चष्माचा जेनिफर मिस्त्रीने निरोप घेतला आहे. मात्र, शोमधून बाहेर पडताना अभिनेत्रीने शोचे निर्माते असित मोदी आणि त्यांच्या टीमवर गंभीर आरोप केले. मात्र, आता असित मोदी आणि त्यांच्या टीमने आरोपांबाबत आपली भूमिका मांडली आहे.

जेनिफरच्या आरोपांना उत्तर देताना, हर्षद जोशी, रुशी डेव आणि अरमान या शोमध्ये काम केलेल्या 3 दिग्दर्शकांची टीम सांगतात की, जेनिफरने अनेकदा नियम तोडले. तसेच, तिचे कामावर पूर्ण लक्ष नव्हते. सर्वांनी मिळून जेनिफरबद्दल अनेकदा प्रोडक्शनकडे तक्रार केली आहे. शूटच्या शेवटच्या दिवशी, जेनिफरने संपूर्ण युनिटसमोर शिवीगाळ केली आणि असभ्य भाषा वापरली आणि शूट पूर्ण न करता सेट सोडला.

जेनिफरने सोहेल रमानी आणि जतीन बजाज यांच्याविरोधातही तक्रार दाखल केली आहे. दोघांचे म्हणणे आहे की जेनिफरने शोच्या संपूर्ण टीमसोबत गैरवर्तन केले. शेवटच्या दिवशी सेट सोडल्यानंतर जेनिफर तिची कार सुसाट वेगाने चालवत होती. वाटेत उभ्या असलेल्या लोकांचीही तिला पर्वा नव्हती. जेनिफरच्या वाईट वागणुकीमुळे आम्ही तिचा करार रद्द केला. या घटनेवेळी असित मोदी अमेरिकेत होते. अशा स्थितीत जेनिफर बिनबुडाचे आरोप करून आपल्या सर्वांना अपमानित करण्याचा प्रयत्न करत आहे. याविरोधात आम्ही तक्रार दाखल केली आहे.

जेनिफरच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना असित मोदी म्हणाले की, जेनिफर माझी आणि शोची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आम्ही तिच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत. तिच्यासोबतचा करार आम्ही रद्द केला आहे. त्यामुळे ती आमच्यावर खोटे आरोप करत आहे.

विशेष म्हणजे, जेनिफर मिस्त्रीने पोलिसांत तक्रार दाखल केली की असित, सोहेल आणि जतीन यांनी 7 मार्च रोजी तिने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सुट्टी मागितल्याने तिच्याशी गैरवर्तन केले. त्याचवेळी सोहेल आणि जतीन यांनी जेनिफरला तिच्या कारमध्ये बसवून धमकावण्याचा प्रयत्न केला.