WTC Final : जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलसाठी भारतीय संघात केएल राहुलच्या जागी इशान किशनचा समावेश


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारतीय संघात केएल राहुलच्या जागी इशान किशनचा समावेश करण्यात आला आहे. केएल राहुल दुखापतीमुळे कसोटी चॅम्पियनशिप फायनलमधून बाहेर पडला असून त्याच्या जागी इशान किशनचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने सोमवारी ही घोषणा केली.

यापूर्वी, लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार राहुल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध आयपीएलमध्ये जखमी झाला होता. राहुलवर शस्त्रक्रिया करावी लागणार असून त्यानंतर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसनासाठी जाणार आहे. अशा स्थितीत अंतिम सामन्यापूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त होणे त्याच्यासाठी कठीण आहे.

पुढील महिन्यात 7 ते 11 जून दरम्यान ओव्हल येथे अंतिम सामना खेळवला जाईल. भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल. ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार आणि सूर्यकुमार यादव यांना अंतिम फेरीसाठी स्टँडबाय ठेवण्यात आले आहे. म्हणजेच हे तीन खेळाडूही भारतीय संघासोबत इंग्लंडला जाणार आहेत. जयदेव उनाडकट आणि उमेश यादव हे दोघेही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारतीय संघाचा भाग आहेत. पण दोघेही दुखापतींशी झुंज देत आहेत.

उनाडकटला आयपीएलदरम्यान नेटमध्ये दुखापत झाली होती. तो खांद्याच्या दुखापतीशी झुंज देत आहे. तो सध्या एनसीएमध्ये पुनर्वसन करत आहे. उनाडकट फायनल खेळणार की नाही याबाबत बीसीसीआय लवकरच निर्णय घेणार आहे. त्याचवेळी उमेश यादव हाताच्या दुखापतीशी झुंजत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली होती. तो सध्या कोलकाता नाईट रायडर्सच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.

WTC फायनलसाठी भारतीय संघः रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट आणि इशान किशन