PAK vs NZ : 48 तासात पाकिस्तानची वनडे राजवट संपली, भारत पुन्हा अव्वलस्थानी, जाणून घ्या काय म्हणाला बाबर आझम?


एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानला नंबर वन होऊन केवळ 48 तास झाले होते, की त्याला आपले अव्वल स्थान गमवावे लागले. त्यांची वनडे राजवट संपली आहे. आयसीसी वनडे क्रमवारीत पाकिस्तान आता भारताच्या मागे पडला आहे आणि, या सर्व निकालांमागे एकच कारण आहे – न्यूझीलंडविरुद्ध 5व्या एकदिवसीय सामन्यात झालेला पराभव.

5 मे रोजी कराची येथे खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेतील चौथ्या सामन्यात न्यूझीलंडचा 102 धावांनी पराभव करून पाकिस्तान प्रथमच पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यात अव्वल स्थानी विराजमान झाला होता. 7 मे रोजी याच मैदानावर खेळल्या गेलेल्या 5व्या एकदिवसीय सामन्यात तो न्यूझीलंडकडून 47 धावांनी पराभूत झाला, ज्यामुळे त्यांना त्यांचे वनडेतील पहिले स्थान गमाववे लागले.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर राहण्यासाठी पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्धची 5वी वनडे कोणत्याही किंमतीत जिंकायची होती किंवा सामना अनिर्णित ठेवावा लागणार होता. कारण असे झाल्यास त्याला 115 रेटिंग गुण मिळाले असते, त्यानंतर तो पहिल्या क्रमांकाचा संघ राहिला असता. पण, 5व्या एकदिवसीय सामन्यातील पराभवानंतर तो आता 112 रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. म्हणजे तो भारताच्याही मागे पडले आहे.

भारताचे 113 रेटिंग गुण असून ते दुसऱ्या स्थानावर आहे. तर, पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर घसरल्यानंतर ऑस्ट्रेलिया पुन्हा वनडेत नंबर वन संघ बनला आहे. ऑस्ट्रेलियाचे देखील 113 रेटिंग गुण आहेत, परंतु दशांश गणनेच्या आधारे ते भारतापेक्षा पुढे आहे.

27 एप्रिल रोजी वनडे मालिका सुरू झाली, तेव्हा पाकिस्तान वनडे क्रमवारीत 5 व्या क्रमांकावर होता. त्यानंतर मालिकेतील सलग 4 सामने जिंकून तो नंबर वन बनला. पण 5व्या वनडेत 300 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग न केल्यामुळे, न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील एकदिवसीय मालिकेत तो क्लीन स्वीपलाच मुकला नाही, तर एकदिवसीय क्रिकेटमधील पहिल्या क्रमांकाचे मानांकनही गमावले.

एकदिवसीय क्रिकेटमधील नंबर वनचे स्थान गमावल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला याबाबत विचारले असता तो म्हणाला, आम्ही नंबर वन नाही असे म्हणू नका. आम्ही पहिल्या क्रमांकावर होता आणि अजूनही आहोत. आम्ही फक्त एकच सामना खराब खेळलो. आम्ही संपूर्ण मालिकेत चांगली कामगिरी केली, पण आम्हाला पाहिजे तसे पूर्ण करता आले नाही. यातून आपण नक्कीच शिकू.

एकदिवसीय क्रिकेटमधील अव्वल स्थान हिसकावून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे, पण पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अजूनही हे मानायला तयार नाही. या वक्तव्याद्वारे त्यांनी प्रथम क्रमांकाचा मुकुट हिसकावल्याचे दु:ख नक्कीच लपविण्याचा प्रयत्न केला आहे, पण काही गोष्टी अशा असतात ज्या लपवता येत नाहीत.