केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात रविवारी एक मोठी दुर्घटना घडली असून एक बोट उलटली असून त्यात 22 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 22 जणात 11 जण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर बोट उलटल्याच्या घटनेची चौकशी केली जाईल, मात्र सुरुवातीला बोटीत प्रवासादरम्यान अनेक नियम मोडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले, जे नंतर मोठ्या अपघाताचे कारण बनले.
Kerala Boat Tragedy : एक नाही तर 4 मोठ्या निष्काळजीपणाची किंमत 22 लोकांनी जीव देऊन चुकवली
या वेदनादायक अपघातासाठी अनेक नियमांकडे दुर्लक्ष करण्याची किंमत 22 जणांचे प्राण देऊन चुकवावी लागली. ही डबलडेकर पर्यटक बोट रविवारी संध्याकाळी प्रवासाला निघाली, तेव्हा ती खचाखच भरलेली होती. जवळपास 40 जणांनी बोटीत बसण्यासाठी तिकिटे खरेदी केली होती, तर अनेक जण तिकीट न घेता बोटीत चढले होते.
मीडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार, बोटीतील प्रवाशांना घालण्यासाठी लाईफ जॅकेटही देण्यात आले नव्हते. या बोटीकडे पर्यटक बोटींसाठी आवश्यक असलेले सेफ्टी सर्टिफिकेटही नव्हते. शिवाय सूर्यास्तानंतर बोटीच्या प्रवासावर बंदी असतानाही रविवारी सायंकाळी उशिरा ती फेरीसाठी काढण्यात आली.
अपघातानंतर बोटीचा मालक फरार असून त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचेही स्थानिक पोलिसांनी सांगितले. अपघातानंतर बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.
मलप्पुरम पोलिसांनी सांगितले की, बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर ते अपघाताची चौकशी करतील. सध्या बोट उलटण्यामागचे कारण स्पष्ट झाले नसले तरी जास्त गर्दी हे त्याचे प्रमुख कारण असू शकते.
या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि शोकसंतप्त कुटुंबांप्रती संवेदनाही व्यक्त केल्या. यासोबतच त्यांनी पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येक पीडित कुटुंबाला प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली.
त्याचवेळी केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी अपघातात प्राण गमावलेल्यांच्या स्मरणार्थ एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या (सीएमओ) वतीने या अपघाताबाबत सांगण्यात आले की मलप्पुरम बोट दुर्घटनेची सर्वंकष न्यायालयीन चौकशी केली जाईल.
यासोबतच सरकारच्या वतीने मृतांच्या कुटुंबीयांना 10-10 लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. तर अपघातातील जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे. सीएमओकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, अपघाताची विशेष पोलिस पथकाकडून चौकशी केली जाईल.