World Cup : अहमदाबादमध्ये होणार हाय व्होल्टेज भारत-पाकिस्तान सामना, तयारीत गुंतली बीसीसीआय !


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याची संपूर्ण जग वाट पाहत आहे. वास्तविक दोन्ही संघ केवळ आयसीसी स्पर्धेतच आमनेसामने येतात. यंदाही या दोघांमध्ये लढत होणार आहे. त्यामुळे हा सामना आणखी हाय-व्होल्टेज झाला आहे, कारण पाकिस्तान भारताच्या भूमीवर खेळणार आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा भारताच्या यजमानपदावर खेळवली जाणार आहे. म्हणजे बऱ्याच कालावधीनंतर दोघेही भारतीय भूमीवर भिडतील. 2016 नंतर प्रथमच भारत पाकिस्तानला घरच्या मैदानावर आव्हान देईल.

या हायव्होल्टेज सामन्याबाबत बीसीसीआय विशेष नियोजन करत आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाऊ शकतो, कारण या स्टेडियमची क्षमता 1 लाखाच्या जवळपास आहे आणि बोर्डाला आशा आहे की विदेशातूनही चाहते भारतात येतील.

बीसीसीआयने अद्याप विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. आयपीएल 2023 संपल्यानंतर बोर्ड वेळापत्रक जाहीर करेल. मात्र यावर वेगाने काम सुरू आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगपैकी एक असलेल्या आयपीएलचा अंतिम सामना 28 मे रोजी अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे. अहवालानुसार, जर सर्व काही वेळापत्रकानुसार झाले तर स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरू होईल.

नागपूर, बेंगळुरू, तिरुअनंतपुरम, मुंबई, दिल्ली, लखनौ, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, राजकोट, इंदूर आणि धरमशाला विश्वचषक सामन्यांसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान आपले बहुतांश सामने बेंगळुरू आणि चेन्नईमध्ये खेळू शकतो.

मात्र, या विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघ भारतात येण्याबाबतची परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. खरे तर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानला जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनीही वर्ल्डकपमधून माघार घेण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली.