रेल्वे स्टेशनवर किंवा ट्रेनमध्ये एमआरपीपेक्षा जास्त दराने खाद्यपदार्थ विकणे पडणार महागात… हा आहे नियम


भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. अशा परिस्थितीत त्यांची सोय राखण्यासाठी रेल्वे वेळोवेळी नवनवीन व्यवस्था करत असते. तुम्हीही अनेकदा ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्या कामी येऊ शकते. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की रेल्वे स्टेशन किंवा चालत्या ट्रेनमध्ये काही वस्तू विकणारे तुम्हाला महागड्या किमतीत किंवा डुप्लिकेट वस्तू देतात. अशा स्थितीत त्यांना आता असे करणे कठीण होऊ शकते. त्यासाठी रेल्वेने नियमही बनवला आहे.

रेल्वेचे अनेक नियम असले तरी ट्रेनमध्ये किंवा स्टेशनवर सामानाच्या बदल्यात जास्त पैसे मागितले गेले, तर तुम्ही त्याबाबत रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करू शकता. त्यानंतर भारतीय रेल्वेही त्यावर कारवाई करते. जर कोणी तुम्हाला वस्तूंच्या बदल्यात जास्त पैसे मागितले, तर तुम्ही काय करू शकता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

रेल्वे स्थानकावर कोणत्याही पॅकेज केलेल्या वस्तूंवर छापलेल्या किंमतीपेक्षा जास्त म्हणजे MRP पेक्षा जास्त किंमतीने विकणे हा गुन्हा आहे. पण तरीही अनेक विक्रेते तुमच्याकडून जास्त पैसे घेतात. मात्र आता असे केल्याने प्रवाशांच्या तक्रारीच्या आधारे रेल्वे दुकानदारावर कारवाई करणार आहे. त्यासाठी त्या दुकानदाराची तक्रार करावी लागेल.

दुकानदाराने तुमच्याकडून छापील किंमतीपेक्षा जास्त पैशांची मागणी केल्यास तुम्ही रेल्वेच्या 139 क्रमांकाच्या हेल्पलाइनवर तक्रार करू शकता. याशिवाय तुम्ही रेल्वे अॅपच्या माध्यमातून अशा लोकांची तक्रारही करू शकता. तुमच्या तक्रारीच्या आधारे, भारतीय रेल्वे त्या दुकानदारावर शक्य ती कारवाई करेल.

तक्रार करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची आवश्यकता असेल. तक्रार करताना तुम्हाला ही सर्व महत्त्वाची माहिती रेल्वेला द्यावी लागेल. यामध्ये विक्रेत्याच्या फूड स्टॉलचे नाव, दुकानदाराचे नाव, स्टेशन आणि प्लॅटफॉर्म क्रमांकाचा समावेश आहे. यासोबतच स्टॉलचा क्रमांक आणि तुम्ही या वस्तू कधी खरेदी केल्या याची माहिती वेळोवेळी रेल्वेच्या हेल्पलाइन किंवा अधिकाऱ्याला द्यावी लागेल.